विशेष प्रतिनिधी
पुणे:ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या स्मृतींशी जोडलेल्या पुण्यातील ऐतिहासिक ‘पंचवटी’ निवासस्थानावरून आता माडगूळकर कुटुंबातच तीव्र वाद निर्माण झाला आहे. गदिमांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर आणि त्यांची आई शीतल श्रीधर माडगूळकर यांनी सोशल मीडियावर एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करत हा कौटुंबिक वाद सार्वजनिक केला आहे.
सुमित्र माडगूळकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे काही जवळच्या नातेवाईकांकडून गदिमांचे ऐतिहासिक ‘पंचवटी’ निवासस्थान पाडून बिल्डरला विकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. “गदिमांची पवित्र वास्तू मी पाडू अथवा विकू देणार नाही. केवळ पैशांसाठी काही लोक पंचवटी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा दावा त्यांनी केला. व, “मी, माझी पत्नी आणि मुलीच्या जीवाला धोका असून माझी खोटी बदनामी केली जात आहे,” असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
गदिमांनी हयात असताना“जोपर्यंत पंचवटी उभी आहे, तोपर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील,” असे म्हटल्याचा उल्लेख करत सुमित्र यांनी या वास्तूला “देऊळ” म्हटले आहे. “ज्या वास्तूमध्ये ‘गीतरामायण’सारखी अमर कलाकृती जन्माला आली, ती वास्तू वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढणार,” असा निर्धारही त्यांनी यावेळी पोस्टच्या माध्यमातून केला.
दरम्यान, या आरोपांना उत्तर देताना शीतल माडगूळकर यांनी सुमित्र यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. “पंचवटीसाठी आजवरचा खर्च आम्ही केला. घर दुरुस्तीपासून देखभालीपर्यंतची जबाबदारी आम्ही उचलली. पण त्या वेळी तू कुठे होतास?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“पंचवटीच्या भिंतींनी कधीही ऐकली नाही अशी अर्वाच्य भाषा तू स्वतःच्या आई, बहिण आणि मेव्हण्याला वापरलीस. ज्यांनी तुला अडचणीच्या काळात मदत केली, त्यांच्याशीच तू गैरवर्तन केलेस,” असा आरोपही शीतल माडगूळकर यांनी केला आहे.
याशिवाय, “पंचवटीसाठी बिल्डर शोधण्यात तूच पुढे होतास. वडिलांनी मृत्युपत्र माझ्या नावावर केल्याचे कळल्यानंतर तुला ५० टक्के हिस्सा हवा होता,” असा दावाही त्यांनी केला. “लोकांच्या गदिमांवरील प्रेमाचा वापर करून स्वतःच्या वागण्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असेही त्यांनी म्हटले.
आईच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुमित्र माडगूळकर यांनी पुन्हा फेसबुक पोस्ट करत गदिमांच्या खोलीची दयनीय अवस्था दाखवणारे काही फोटो शेअर केले. “गदिमांच्या खोलीला अडगळघर बनवण्यात आले आहे. आम्ही साफसफाई करायला गेलो तर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते,” असा आरोप त्यांनी केला.
“गदिमांचे घर मुद्दाम दुर्लक्षित ठेवले जात आहे, जेणेकरून ते मोडकळीस येईल आणि नंतर बिल्डरला विकणे सोपे जाईल,” असा गंभीर आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा पंचवटी वाचवण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान,साहित्यविश्वात आणि गदिमांवर प्रेम असलेल्या चाहत्यांमध्ये वादाची मोठी चर्चा सुरू आहे.
Dispute in the Madgulkar family over Gadima’s ‘Panchavati’; Grandson Sumitra and mother Sheetal Madgulkar face to face
महत्वाच्या बातम्या
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
- Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा