विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची गुरुवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. मोशी टोलनाका परिसरातील युवराज रेस्टॉरंट अँड बार येथे ही थरारक घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवत मोरे यांच्यावर सपासप वार केले.
गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अनिल मोरे हे काही सहकाऱ्यांसह मोशी टोलनाका परिसरातील युवराज रेस्टॉरंट अँड बार येथे गेले होते. याचवेळी काही अज्ञात आरोपी तेथे आले आणि त्यांनी मोरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेल्या मोरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान, अनिल मोरे यांच्या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुने वैमनस्य, राजकीय वाद किंवा आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाला का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांकडून मोरे यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अनिल मोरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वायसीएम रुग्णालयात करण्यात आले आहे. मात्र, “जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा आक्रमक पवित्रा आरपीआय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले असून, पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
RPI leader brutally murdered near Moshi toll naka; workers refuse to take body until accused are arrested
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी