विशेष प्रतिनिधी
पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने पुढे जात असून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील कथित मास्टरमाईंड म्हणून लातूरमधील सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केल्यानंतर आता पुण्यातील वरिष्ठ प्राध्यापिका मनिषा मांढरे यांना देखील सीबीआयने ताब्यात घेतल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, गेली तब्बल २४ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि जीवशास्त्र विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून ओळख असलेल्या मनिषा मांढरे या नेमक्या कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? आणि त्या NEET परीक्षेशी कशा जोडल्या गेल्या? याबाबत आता विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
२४ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव
मनिषा मांढरे या पुण्यातील मॉडेल कॉलेजमध्ये जीवशास्त्र विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. विद्यार्थ्यांमध्ये शांत, अभ्यासू आणि अनुभवी शिक्षिका अशी त्यांची ओळख होती. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जवळपास दोन दशकांहून अधिक काळ काम केले असून विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचाही त्यांना मोठा अनुभव असल्याचे सांगितले जाते.
मॉडेल कॉलेजच्या मुख्याध्यापिका निवेदिता एकबोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा मांढरे गेली अनेक वर्षे संस्थेशी जोडलेल्या होत्या आणि त्यांच्याविरोधात यापूर्वी कोणतीही गंभीर तक्रार समोर आलेली नव्हती. वरिष्ठ शिक्षिका म्हणून त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात येत होत्या.
NTA सोबत पाच ते सहा वर्षांपासून संबंध
मनिषा मांढरे या राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA सोबत गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ‘असोसिएट’ म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. NEET सारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या प्रक्रियेत विषयतज्ज्ञ, पेपर मॉडरेटर किंवा गोपनीय शैक्षणिक सहाय्यक म्हणून काही प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते.
मुख्याध्यापिका निवेदिता एकबोटे यांनी स्पष्ट केले की, NTA आणि संबंधित शिक्षकांमध्ये गोपनीयतेच्या नियमांनुसार थेट संवाद असतो. पेपर सेटिंगची प्रक्रिया, शिक्षक कुठे जातात किंवा त्यांची नेमकी भूमिका काय असते, याची माहिती संबंधित महाविद्यालयालाही दिली जात नाही.
मनिषा मांढरे यांच्या चौकशीतून पेपर सेटिंग, गोपनीय माहितीची देवाणघेवाण, संभाव्य आर्थिक व्यवहार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली? यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Professor who guides students under investigation; Who exactly is Manisha Mandhare?
महत्वाच्या बातम्या