गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीतील तीन बांगलादेशींना पुणे विमानतळावर पकडले

विशेष प्रतिनिधी

पुणे : खडक पोलीस स्टेशन आणि विमानतळ पोलीसांनी संयुक्त कारवाई करत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन बांगलादेशी महिला आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही गुवाहाटी, आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम सुरू असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांना माहिती मिळाली की, काही बांगलादेशी नागरिक पुणे विमानतळावरून गुवाहाटीकडे रवाना होणार आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

माहिती मिळताच खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तातडीने पुणे विमानतळावर रवाना करण्यात आले. विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी, सीआयएसएफ जवान आणि खडक पोलिसांनी संयुक्तरीत्या सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.



चौकशीत त्यांनी आपली नावे शाहीनूर बेगम शेख (वय ४२), शागुरिका बेगम युलिया शेख (वय २८) आणि टोपू ऊर्फ मुराद अहमद शेख (वय १६ वर्षे ९ महिने) अशी सांगितली. तिघेही बांगलादेशातील बिगाराट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले. ते सोलापूरहून पुण्यात आले होते आणि पुण्याहून गुवाहाटीकडे जाण्याच्या तयारीत होते.
या तिघांना पुढील कारवाईसाठी विमाननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, किरण ठवरे, निलेश दिवटे, शुभम केदारी, विश्वजित गोरे, विकास पांडोळे, मपोशि माने तसेच विमानतळ पोलीस आणि सीआयएसएफच्या पथकाने सहभाग घेतला.

Three Bangladeshis caught at Pune airport while attempting to flee to Guwahati

महत्वाच्या बातम्या