विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात कर्करोगाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ तयार करण्यात येत आहे. पुणे महापालिकेने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला.
पुणे महानगरपालिका आणि ‘ आपुलकी’ हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्करोगाच्या उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही करावा लागतो. हीच बाब लक्षात घेत सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे. महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे.
राज्यभरातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि समन्वयित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी कर्करोग ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्वसामान्यांना नागरिकांना सरकारी दरामध्ये पुणे महापालिकेने सुरू केलेल्या या रुग्णालयामध्ये उपचार मिळणार असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाचे आणि संबंधित संस्थेचे कौतुक केले. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाने यांचा पुढाकारातून हे रुग्णालय सुरू करण्यात आल्याचे फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
बाणेर येथे सुमारे एक एकर महापालिकेच्या जागेत हे उभारण्यात आले आहे. हा १६५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामध्ये पुणे महापालिकेने १४ कोटी रुपयांची जमीन उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित गुंतवणूक, व्यवस्थापन आणि कर्मचारी खर्चाची जबाबदारी संबंधित संस्था म्हणजेच अपुलकी मेडिकल केअर सेंटर पार पाडणार आहे. हा देशातील कोणत्याही महानगरपालिकेचा पहिला पीपीपी मॉडेल कर्करोग सेंटर असल्याचे विशेष नमूद केले जात आहे. सुमारे १५० खाटांची क्षमता या रुग्णालयाची आहे.