विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shivraj Motegaonkar देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर येथील ‘आलोक’ नावाचा संशयित मास्टरमाइंड आला आहे. या आलोकनेच किमान एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे.तर दुसरीकडे, याच नामांकित ‘आरसीसी क्लासेस’चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकरच्या मुलालाही चौकशीसाठी सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.Shivraj Motegaonkar
नीट घोटाळ्याच्या तपासात नागपूरच्या ‘आलोक’ या गूढ नावाभोवती आता सीबीआयचा फास आवळला जात आहे. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेले त्याचे कारनामे थक्क करणारे आहेत. आलोकने देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जवळपास १ हजार विद्यार्थ्यांपर्यंत थेट किंवा दलालांमार्फत पेपर पोहोचवल्याचा संशय आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आलोकने अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुण्यात बोलावून घेतले होते. तेथेच गोपनीय ठिकाणी ठेवून त्यांना पेपर रटवून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आलोक हा नागपुरातील कोणत्या मोठ्या रॅकेटचा हिस्सा आहे की तो स्वतःच मुख्य सूत्रधार आहे, याबाबत सीबीआयने गोपनीयता पाळली असून त्याचा कसून शोध सुरू आहे.Shivraj Motegaonkar
सीबीआयच्या मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सीबीआयचे तपासप्रमुख विनोद चौधरी यांनी नुकतीच नांदेडमध्ये धाड टाकली होती. नीट पेपरफुटी प्रकरणात नांदेडमधील हॉटेल व्यावसायिक कदम परिवाराची चौकशी केली असता ‘आलोक’चे नाव समोर आले.
नांदेडच्या विद्युतनगरमधील अश्विनी कदम नावाच्या महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपयांना नीटचा पेपर खरेदी केला होता. त्यासाठी २५ हजार रुपये ऑनलाईन टोकन मनी म्हणून दिले गेले. त्यानंतर आलोकने या मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना १५ दिवस पुण्यात एका ठिकाणी थांबवून ठेवले आणि तिथेच तिला प्रत्यक्ष पेपर दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील सीबीआय कार्यालयात मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून ही चौकशी सुरू आहे. मोटेगावकर यांच्या मुलासोबतच त्यांच्या ‘आरसीसी’ क्लासमध्ये शिकणाऱ्या इतर तीन विद्यार्थ्यांचीही त्यांच्या पालकांसह चौकशी करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या का आणि यामागे मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचा सीबीआय सखोल तपास करत आहे.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढताच नांदेडमधील अनेक नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. सत्र संपल्याचे कारण पुढे करत अनेक क्लासेसने आपली कार्यालये घाईघाईने बंद केली आहेत, तर काही संशयित संचालक शहरातून फरार झाले आहेत. याच प्रकरणात पुण्यातून अटक झालेल्या मॉडर्न कॉलेजच्या जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर महाविद्यालय प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. २००२ पासून कार्यरत असलेल्या मांढरे यांचे निलंबन १६ मेपासून लागू करण्यात आल्याचे परिपत्रक कॉलेजने काढले आहे.
नीट पेपरफुटीच्या वाढत्या वादामुळे आता केंद्र सरकार आणि परीक्षा घेणारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ अडचणीत आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संसदीय स्थायी समितीने ‘एनटीए’चे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी आणि शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट समन्स बजावले आहे. येत्या २१ मे रोजी संसदेत या विषयावर हाय-प्रोफाइल बैठक होणार असून एनटीए प्रमुखांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक करताच राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी खाजगी क्लासेस परिसरातील मोटेगावकरांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या नामफलकावर काळी शाई फेकून तीव्र निषेध व्यक्त केला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एआयएमआएम’च्या वतीने कोकणवाडी येथील मोटेगावकर यांच्या क्लासेस समोर आंदोलन करण्यात आले.
शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या आई-वडिलांचे आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे आणि नामांकित कॉलेजमधून इंजिनिअर होऊन बाहेर पडावे हेच स्वप्न असते. त्यातूनच नीट, जेईई मेन्स, जेईई अॅडव्हान्सच्या क्लास चालकांचे फावले. त्यांच्यात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. विद्यार्थ्यांचा आपल्याच क्लासकडे ओढा रहावा म्हणून खोट्या जाहिराती छापणे सुरू केले. त्यातूनच एकाच विद्यार्थ्याचे फोटो तीन-तीन चार-चार क्लासच्या जाहिरातीवर झळकू लागले. शिक्षणाची पंढरी म्हणून पुण्यानंतर लातूरकडे पाहिले जावू लागले. या जीवघेण्या स्पर्धेतून लातूरमध्ये काही वर्षांपूर्वी एका खासगी क्लासचालकाची गोळ्या झाडून हत्याही झाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणी शिवराज मोटेगावर याचीही चौकशी झाली होती.
Paper sold to over 1,000 students; Shivraj Motegaonkar’s son also detained for questioning
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा