विशेष प्रतिनिधी
पुणे : नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.
लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणल्यानंतर सीबीआयने अनेक तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या पालकाला झालेली ही पहिली अटक आहे.
डॉ. मनोज शिरुरे हे लातूरमधील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक आहेत. सीबीआयचे पथक रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून असून मोटेगावकरच्या संपर्कातील सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे. शिरुरे यांच्या रुग्णालयात पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी साडेचार तास तपास केला. या दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे यांचे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. मागील काही वर्षांपासून ते या नेटवर्कच्या संपर्कात असल्याचा संशयही सीबीआयला आहे.
सीबीआयच्या तपासातून पेपरफुटीचा संपूर्ण कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचण्यात आल्याचे समोर आले आहे. मोटेगावकरने आपल्या क्लासमधील पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये सहभागी करून घेतल्याचा आरोप आहे. कुलकर्णी यांच्याकडे केमिस्ट्री तर मनीषा मांढरे यांच्याकडे बायोलॉजी विषयाची जबाबदारी होती. प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी प्रश्न पाठ केले आणि नंतर ते हाताने लिहून मोटेगावकरकडे पोहोचवले. त्यानंतर मोटेगावकरने हे सर्व प्रश्न पीडीएफ स्वरूपात मोबाईलमध्ये साठवून ठेवले होते.
हे प्रश्न आणि उत्तरे पैशांच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात होते. डॉ. मनोज शिरुरे यांनी स्वतःच्या मुलासाठी ही प्रश्नपत्रिका घेतल्याचा आरोप असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. सीबीआयच्या हाती आलेल्या डिजिटल पुराव्यांमुळे या रॅकेटमध्ये अनेक जण सामील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोटेगावकरने परीक्षा झाल्यानंतर मोबाईलमधील सर्व माहिती डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सीबीआयने तांत्रिक मदतीने तो डेटा पुन्हा मिळवला आणि त्यानंतर संपूर्ण जाळे उघडकीस आले.
Dr. Manoj Shirure arrested in NEET 2026 paper leak case from
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा