रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरे निर्दोष; ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल

विशेष प्रतिनिधी

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत निर्दोष मुक्त केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनादरम्यान चिथावणीखोर भाषण केल्याचा तसेच हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, सरकारी पक्षाला ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने निकाल देताना तपास यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेषतः पुरावा म्हणून सादर करण्यात आलेल्या सीडीला “काडीचीही किंमत नाही” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचे कोणतेही ठोस पुरावे सरकारी पक्षाला सादर करता आले नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण करणारे व्यक्ती मनसेचे कार्यकर्तेच होते, हे देखील अभियोजन पक्ष सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे संशयाचा फायदा आरोपींना देत सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.



सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट

मागील सुनावणीवेळी 13 मे रोजी स्वतः राज ठाकरे न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत “माझा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही,” असे स्पष्टपणे सांगितले होते. अंतिम निकालाच्या दिवशीही राज ठाकरे न्यायालयात उपस्थित होते. यावेळी मनसेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच अविनाश जाधव हे देखील न्यायालय परिसरात उपस्थित होते. निकालानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत घोषणाबाजी केली.

2008 मध्ये कल्याण रेल्वे स्टेशन येथे रेल्वे भरती प्रक्रिया सुरू असताना मोठा गोंधळ उडाला होता. “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांकडून हिरावल्या जात आहेत” असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले होते. आंदोलनादरम्यान उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण, रेल्वे मालमत्तेची तोडफोड आणि सार्वजनिक हिंसाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते.
या घटनांनंतर राज ठाकरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसेच्या आंदोलनामुळे राज्यात मोठे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले होते. विशेषतः मराठी विरुद्ध परप्रांतीय हा मुद्दा त्या काळात राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला होता.

Raj Thackeray acquitted in railway recruitment agitation case; Thane Sessions Court delivers

महत्वाच्या बातम्या