विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी आणि सीबीलस्कोअरच्या कारणावरून कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज नाकारू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात खरीप हंगाम, पीककर्ज आणि शेतकरी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत राज्यातील कर्जवाटपाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि ग्रामीण बँका राज्यातील सुमारे 67 टक्के शेतकऱ्यांना कर्ज पुरवतात, तर राष्ट्रीयकृत बँकांचे योगदान केवळ 26 टक्के असल्याचे निदर्शनास आले. जिल्हा सहकारी बँकांनी 80 टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण केले असताना राष्ट्रीयकृत बँकांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्यांना लक्ष्यपूर्तीबाबत तंबी देण्यात आली.
मुख्यमंत्री म्हणाले की, सीबीलची सक्ती करू नये. सर्व बँकांनी आपल्या शाखांना स्पष्ट सूचना देऊन शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना सहज आणि वेळेत कर्ज मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीत कर्जमाफी प्रक्रियेबाबतही चर्चा झाली. बँकांकडून आवश्यक माहिती कोणत्या स्वरूपात घ्यायची, जुन्या खात्यांवरील कपातीचे निकष काय असतील, यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
यंदाच्या खरीप हंगामावर अल निनोचे संकट असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हवामान खात्याच्या अंदाजाचा उल्लेख केला. राज्यात यंदा सरासरीच्या सुमारे 88 टक्के पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर राहू शकते, असे त्यांनी नमूद केले. जूननंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी होत जाण्याची शक्यता असल्याने पाण्याचे नियोजन आणि संरक्षित सिंचनावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक जिल्ह्याला अल निनोच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले असून कमी पाण्यात तग धरणारी बियाणे आणि वाण उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ‘साथी’ पोर्टलवर नोंदणीकृत आणि प्रमाणित बियाणेच खरेदी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ‘महाविस्तार 2.0’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. हे अॅप शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मार्गदर्शक म्हणून काम करणार असून हवामान, पीक व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि शेतीविषयक विविध माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत उपलब्ध होणार आहे. तसेच ‘क्रॉप्सअॅप’च्या माध्यमातून पिकांचे फोटो अपलोड करून संभाव्य रोग आणि उपाययोजनांची माहिती मिळणार आहे.
डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीचीही सुरुवात करण्यात आली असून शेतकरी स्वतः मोबाईलद्वारे पिकांची नोंद करू शकणार आहेत. यामुळे पीकविमा प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय सेंट्रल बँक डिजिटल करंसी आणि कृषी उत्पादनांच्या ट्रेसेबिलिटीसाठी QR कोड आधारित प्रणालीचेही लोकार्पण करण्यात आले. यामुळे शेतकरी योजनांचे पैसे थेट डिजिटल वॉलेटमध्ये जमा होतील आणि कृषी उत्पादनांचा संपूर्ण तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
Increase farm loan disbursal, don’t deny credit over CIBIL scores”: CM Devendra Fadnavis directs
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा