पक्षीय बलाबलामुळे महायुतीचे पारडे जड; पार्थ पवारांनी केली सुनील टिंगरे यांची नाराजी दूर!

विशेष प्रतिनिधी

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षीय बलाबलाच्या गणितात महायुतीचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे. एकूण ८२७ मतांपैकी तब्बल ७३४ मते भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या ताब्यात असल्याने महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालापेक्षा महायुतीला किती मताधिक्य मिळणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मतदारसंघाच्या एकूण मतदारांमध्ये ग्रामीण भागातील तब्बल ५७० मतदारांचा (स्वीकृत सदस्यांसह) समावेश असून पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांतील मतदारांची संख्या ३०६ इतकी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांचे प्रमाण शहरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील नेतृत्वाला संधी दिलेली नसल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे महायुतीतील जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याने या जागेवर भाजपकडूनही दावा केला जात होता. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने सामंजस्याने निर्णय घेत जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपविली. त्यामुळे संभाव्य अंतर्गत संघर्ष आणि बंडखोरी टळल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये होण्यापूर्वी १९९८ मध्ये या मतदारसंघाची निवडणूक झाली होती. त्यावेळी पक्ष अस्तित्वात नसल्याने काँग्रेसचे वर्चस्व होते आणि पिंपरी-चिंचवडचे ज्येष्ठ नेते प्रा. रामकृष्ण मोरे विजयी झाले होते. त्यानंतर १९९९ मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेनंतर २००३ मधील पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. त्यानंतर २००४, २००९ (पोटनिवडणूक), २०१० आणि २०१६ अशा चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देताना ग्रामीण भागातील नेतृत्वाला संधी दिली नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.



विक्रम काकडे यांनी १ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. पक्षातील काही स्थानिक नेत्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. सुरेश घुले आणि रामदास गाढे यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे कार्यालयात उमेदवारी निश्चित करण्यासाठी सुमारे पाच तास बैठक झाली. सुरुवातीला माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अन्य नावांवर चर्चा झाली. अखेर विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. अनेकांनी राजीनामे दिले, परंतु सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यासाठी मंगळवारी पुण्यात पार्थ पवारानी चर्चा केली, यावेळी विक्रम काकडे देखील उपस्थित होते.

सुनील टिंगरे यांनी बाहेर येऊन पत्रकारांशी बोलताना सांगितले की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही काळजी करू नका असे सांगितले आहे. मी पक्षासाठी काम करत राहणार मी दादांचा कार्यकर्ता आहे, मी नाराज नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. पक्षाला काही निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे हा निर्णय घेतला आहे आणि जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य असल्याचे देखील ते म्हणाले यानंतर सुनील टिंगरे यांनी आपल उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Due to party strength, the grand coalition is heavy; Partha Pawar removed Sunil Tingre’s displeasure!

महत्वाच्या बातम्या