विशेष प्रतिनिधी
मुंबई : दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर येतात. यानंतर विरोधकांकडून मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाला लक्ष्य केले जाते. मात्र, मुंबई कधीही पूर्णपणे ठप्प होत नाही आणि बुडतही नाही. काही मोजकेच सखल भाग वारंवार दाखवून संपूर्ण मुंबई बुडाल्याचा आभास निर्माण केला जातो, असा दावा मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी केला.
अश्विनी भिडे म्हणाल्या, भौगोलिकदृष्ट्या मुंबई तीन बाजूंनी समुद्राने वेढलेली आहे, त्यातच येथे पावसाचे प्रमाणही सर्वाधिक असते. ज्या दिवशी समुद्रात हायटाईड असते आणि त्याच वेळी मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचते. गेल्या अनेक वर्षांपासून पालिका या समस्येवर सातत्याने काम करत आहे.
पूर्वी मुंबईत अशी २०० हून अधिक पाणी साचणारी ठिकाणे होती, त्यावर योग्य उपाययोजना केल्यामुळे आता ही संख्या ९० च्या आसपास आली आहे. येत्या काळात ही संख्या आणखी कमी होईल. मात्र, तोपर्यंत काही काळासाठी विशिष्ट भागांत पाणी साचू शकते. परंतु, पावसामुळे मुंबई पूर्णपणे ठप्प होते, ही वस्तुस्थिती नाही. बऱ्याचदा समाजमाध्यमांवर किंवा अंदाजांमध्ये परिस्थिती अतिशयोक्ती करून दाखवली जाते. गेल्या वर्षीही मुंबईत विक्रमी पाऊस झाला, तरीही मुंबई लोकल फार तर तासभरासाठी विस्कळीत झाले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून केवळ काही बसचे मार्ग बदलावे लागले होते. प्रशासनाच्या चोख पूर्वतयारीमुळे आता परिस्थितीत मोठी सुधारणा होत आहे.
पावसाचे पाणी साचू नये म्हणून मुंबईत चार ठिकाणी मोठ्या भूमिगत टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीच्या वेळी या टाक्यांमध्ये पाणी साठवून नंतर ते पंपाद्वारे बाहेर उपसले जाते. याशिवाय, सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी सात मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे. तसेच, मुंबईतील खड्ड्यांची समस्या कायमची सोडवण्यासाठी रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर सिमेंटीकरण केले जात आहे. त्यामुळे, मुंबई बुडालेली पाहणाऱ्यांनाच तशी दिसते पण प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. अतिवृष्टी आणि भरती एकाच वेळी आल्यास केवळ सखल भागात पाणी साचते आणि तेही दोन तासांपेक्षा जास्त वेळ टिकत नाही. काही मोजकेच सखल भाग वारंवार दाखवून पूर्ण मुंबई बुडाल्याचे चित्र उभे केले जाते, जे चुकीचे आहे. मुंबई कधीही बुडत नाही, असं अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.
मुंबई हे खरोखरच स्वप्नांचे शहर असल्याने रोजगारासाठी दररोज हजारो लोक येथे येतात. साहजिकच, मुंबईची लोकसंख्या अफाट आहे आणि त्या तुलनेत जागा अत्यंत मर्यादित आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सर्व नागरी सुविधा पुरवताना प्रशासनासमोर अनेक आव्हाने उभी राहतात, असं अश्विनी भिडे म्हणाल्या.
Repeated focus on low-lying areas creates false impression that entire Mumbai is flooded: Ashwini Bhide
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन