विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. परंतु, 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींसोबत कोणतीही चर्चा न करता विधान परिषद निवडणुकीतील अर्ज माघारी घेतल्याने तर मोठी खळबळ उडाली आहे. ज्यामुळे गुरुवारी (4 जून) शिवसेना ठाकरे गटाने तीन तासांत तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. ज्यानंतर आता काँग्रेसकडूनही हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कारण, शुक्रवारी (5 जून) पक्षाने अर्ज मागे घेतलेल्या दोन उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
यवतमाळ विधान परिषदेतून अर्ज मागे घेणाऱ्या साहेबराव कांबळे आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विधान परिषदेतून उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी मविआकडून साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा सामना महायुतीचे उमेदवार दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांच्याशी होणार होता.
मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्याचे कारण देत कांबळे यांनी, “निवडणुकीसाठी आवश्यक संख्याबळ उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेतला,” असे सांगितले. तसेच उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस पक्षाचे आभारही मानले. परंतु, पक्षाच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता त्यांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.