राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ, कृषि मंत्र्यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सरकारला 36 हजार 585 कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आवश्यक वाटल्यास निकषांमध्ये सुधारणा करण्यास सरकार तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दत्तात्रय भरणे म्हणाले की, सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळेल, असा अंदाज आहे. सरकार आर्थिक अडचणीत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.अटींमध्ये सुधारणा करण्याची गरज असेल तर त्या केल्या जातील,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकार कर्जमाफीतील काही निकषांबाबत फेरविचार करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



शेतकऱ्यांना पेरणीबाबतसल्ला देताना भरणे म्हणाले की, 12 ते 15 जूनदरम्यान हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करावी. राज्यात सर्वत्र एकसारखा पाऊस पडणार नाही. विशेषतः मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने घाईघाईने पेरणी करू नये. हवामान खात्याचा अंदाज आणि स्थानिक परिस्थिती पाहूनच शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा.

मे आणि जून महिन्यात झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांना फटका बसला. सुमारे 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. जळगाव, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे भरणे यांनी सांगितले.

राज्यात सध्या पुरेसा खतसाठा उपलब्ध आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आम्ही अतिरिक्त पुरवठ्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा भरणे यांनी दिला.

शेतमालाला हमीभाव मिळावा, या मागणीवर आंदोलन करणारे बच्चू कडू यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचेही भरणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळाला पाहिजे, याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

56 Lakh Farmers in Maharashtra to Benefit from Loan Waiver, Says Agriculture Minister

महत्वाच्या बातम्या