विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्या पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते, ज्या पोलिसांवर महिलांच्या रक्षणाची जबाबदारी असते… त्याच खात्यातील एका निवृत्त बड्या अधिकाऱ्याने आपल्याच सुनेचा छळ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे! धक्कादायक बाब म्हणजे, या एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने सुनेकडे थेट शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. ‘मी पोलीस होतो, पुरावे कसे नष्ट करायचे हे मला चांगलंच माहिती आहे’ अशी धमकीही या सासऱ्यानकडून सुनेला देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Retired ACP
पीडित महिलेचा विवाह एप्रिल २०२२ मध्ये सासवड येथे झाला होता. त्याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये विमाननगरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत थाटामाटात या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी लग्नाचा संपूर्ण खर्च केला, हौसेने सोन्या-चांदीचे दागिने दिले. पण, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सासरच्या लोकांनी आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. सुनेचे सगळे दागिने सासूने स्वतःच्या ताब्यात घेतले आणि तिथूनच शाररिक व मानसिक छळाला सुरुवात झाली.
ही सर्व बाब फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.पती विक्रांत हा विवाहितेला वारंवार घरात कोंडून ठेवायचा. तिला नोकरी करण्यास सक्त मनाई करण्यात आली, इतकेच नव्हे तर तिचे सोशल मीडिया अकाऊंट्स देखील बळजबरीने बंद करायला लावले. पीडितेचे आई-वडील जेव्हा मुलीला भेटायला घरी यायचे, तेव्हा सासरच्यांकडून त्यांचाही अपमान केला जात होता.
पीडितेने फिर्यादीत सासऱ्याने दिलेल्या धमकीचाही उल्लेख देखील केला आहे. “मी एसीपी होतो, गुन्ह्याचे पुरावे कसे नष्ट करायचे हे मला चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे माझ्याविरुद्ध काही करायचा प्रयत्न करू नको,” असे सांगून सासरा तिच्यावर प्रचंड दबाव आणायचा. विवाहितेने सासरच्या जाचाला विरोध केला असता, “माझ्याकडे अजूनही बंदूक आहे, तुला इथेच मारून गाडून टाकेन!” अशी थेट जीवे मारण्याची धमकी निवृत्त एसीपी सासऱ्यांकडून देण्यात येत होती.तसेच सतत पती, सासू आणि नणंदांकडून विवाहितेला शिवीगाळ व अमानुष मारहाण केली जात होती. त्यातच सासऱ्याने तिच्याकडे प्रत्यक्ष शारीरिक सुखाची मागणी केल्याचा अत्यंत गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
अखेर या रोजच्या नरकयातनांना कंटाळून आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या विवाहितेने पोलिसांचे दार ठोठावले. पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी अत्यंत गांभीर्याने दखल घेत, निवृत्त एसीपी सुरेश रामचंद्र घाडगे यांच्यासह कुटुंबातील तब्बल ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये पती विक्रांत घाडगे, सासू सुनंदा घाडगे, नणंदा स्नेहल सर्जेराव व वैशाली राऊत, आणि जावई प्रवीण सर्जेराव व विक्रम राऊत यांचा समावेश आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Retired ACP’s family harasses daughter-in-law; incident in Pune.
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप