विशेष प्रतिनिधी
मुंबई :Rujul Patil राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे नावही संभाव्य बंडखोरांमध्ये घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची कन्या आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका राजुल पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.Rujul Patil
या सर्व चर्चांना पूर्णविराम देत राजुल पाटील यांनी रविवारी थेट ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.Rujul Patil
“मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. माझी भूमिका मी त्यांच्यासमोर स्पष्ट केली आहे. मी त्यांच्यासोबतच आहे आणि पक्षाशी निष्ठावान राहणार आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन,” असे राजुल पाटील यांनी सांगितले.
राजुल पाटील यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला ईशान्य मुंबईत मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे लवकरच ईशान्य मुंबईचा दौरा करणार असून या दौऱ्यात राजुल पाटील सक्रिय भूमिका बजावतील, अशीही चर्चा आहे. याबाबत विचारले असता त्यांनी, “उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मी उपस्थित राहणार आहे. माझ्या निर्णयामुळे ते अत्यंत समाधानी आणि आनंदी आहेत,” असे सांगितले.
दरम्यान, खासदार संजय दिना पाटील यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विचारले असता राजुल पाटील यांनी कौटुंबिक आणि राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्याचे स्पष्ट केले. “तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आमच्या कुटुंबात प्रत्येकाला आपली राजकीय भूमिका ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांचा अंतिम निर्णय ते स्वतःच जाहीर करतील,” असे त्या म्हणाल्या.
विशेष म्हणजे, अलीकडेच शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात राजुल पाटील अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, त्यांनी त्या दिवशी सोशल मीडियावरून शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता मातोश्रीवरील भेटीनंतर त्यांनी आपली राजकीय निष्ठा जाहीरपणे व्यक्त केल्याने ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.