पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा , हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपा सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ व कुचकामी आहे, फक्त पोकळ घोषणा करण्यातच हे सरकार आघाडीवर असून यांना एक परिक्षाही धड घेत येत नाही. नीट पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रात रविवार दिनांक २८ जून रोजी होणारा TET परीक्षेचा पेपर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस लवकरच रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.



सपकाळ म्हणाले की, भाजपा सरकारला एकही परीक्षा पेपर फुटीशिवाय घेता येत नाही,सरकार पेपर फोडणाऱ्या रॅकेटचा बंदोबस्त करू शकत नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर, स्वप्नांवर आणि भविष्यावर पाणी फेरणाऱ्या या रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कोणाचं आहे? एकीकडे “पारदर्शक कारभार”च्या घोषणा, तर दुसरीकडे पेपरफुटीचं अखंड सत्र सुरु आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की पेपर आधीच कोणाकडे पोहोचतोय याची चिंता करायची? विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्याही जिवाला घोर लावणारा हा पेपरफुटीचा रोग दिवसेंदिवस वाढत चालला असून सरकार मात्र किरकोळ कारवाई करण्यापलीकडे जात नाही. पेपरफुटीच्या या रोगावर जालीम उपाय करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पेपरफुटी ही हुशार, होतकरू व प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे. परीक्षेतील हा घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे आहे असेही सपकाळ म्हणाले..

नीट परिक्षेचा पेपर फुटल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात आला, लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले पण अद्याप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. परदेशात जाऊन महिला पंतप्रधानांना चॉकलेट वाटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर एक वाक्यही उच्चारले नाही. विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करणारा भाजपा सरकारचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. तरुण देशाचे भविष्य आहेत, त्यांच्याच भविष्याशी खेळ सुरु असून हेच तरुण भाजपाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

Conduct an immediate impartial probe into paper leak, take strict action against the guilty: Harshvardhan Sapkal

महत्वाच्या बातम्या