TET 2026 : टीईटी परीक्षेचा पेपरफुटीचा संशय; राज्यभरातील २८ जूनची परीक्षा पुढे ढकलली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : TET 2026 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आधीच काही व्यक्तींकडे असल्याचे आढळून आल्यानंतर परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला.TET 2026

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण १,०२८ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा होणार होती. नीट २०२६ परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन यावेळी प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या.TET 2026



मात्र, २७ जून रोजी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला. तेथे काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पडताळणी केली असता, संबंधित व्यक्तींकडे असलेले काही प्रश्न टीईटी जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात होणे आवश्यक असल्याचे सांगत परीक्षा परिषदेने २८ जूनची टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षेची नवीन तारीख आणि पुढील अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले.

दरम्यान, टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी २०१८ आणि २०१९ मधील परीक्षांमध्येही पेपरफुटी आणि अन्य गैरप्रकार उघडकीस आले होते. त्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपास करून अनेक आरोपींना अटक केली होती, तसेच गैरप्रकारात सहभागी असलेल्या ९ हजारांहून अधिक उमेदवारांची पात्रता रद्द करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा टीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

TET 2026 postponed after suspected paper leak, probe underway

महत्वाच्या बातम्या