विशेष प्रतिनिधी
मुंबई : BMC मुंबईकरांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार अन्न व पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दादर येथील महापालिका विश्लेषक प्रयोगशाळेत अन्न व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल आता अवघ्या २४ तासांत उपलब्ध करून दिला जाणार असून तो मोबाईल, ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे नागरिकांना पाठविण्यात येणार आहे.BMC
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेली ही प्रयोगशाळा गेल्या १२३ वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत आहे. सन १९०३ पासून सुरू असलेल्या या प्रयोगशाळेचे काळानुरूप आधुनिकीकरण करण्यात आले असून, गेल्या दहा वर्षांत येथे सात लाखांहून अधिक अन्न व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.BMC
प्रयोगशाळेत दरवर्षी ७० हजारांहून अधिक अन्न व पाण्याच्या नमुन्यांचे विश्लेषण केले जाते. यामध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील पिण्याच्या पाण्याचे नमुने, खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थ, बर्फ, बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी तसेच जलतरण तलावातील पाण्याचे नमुने यांचा समावेश असतो. दरवर्षी ४५ हजारांहून अधिक पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते.
याशिवाय मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, शालेय मध्यान्ह भोजन योजना तसेच पोलीस विभागाकडून पाठविण्यात येणारे प्रतिबंधित पदार्थ, गुटखा, सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूचे नमुनेही येथे तपासले जातात. अशा सुमारे आठ हजार नमुन्यांचे विश्लेषण दरवर्षी केले जाते.
अत्याधुनिक उपकरणे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या प्रयोगशाळेला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून (FSSAI) राज्यस्तरीय अन्न प्रयोगशाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. प्रयोगशाळेचे आणखी आधुनिकीकरण करण्यासाठी अद्ययावत प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या या प्रयोगशाळेत अत्यल्प शुल्कात अन्न आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध असून नागरिक, गृहनिर्माण संस्था, खाद्यपदार्थ विक्रेते आणि व्यावसायिक आस्थापनांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी केले आहे.
Food and water test reports in 24 hours; BMC to deliver results via mobile and email
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली