विशेष प्रतिनिधी
पुणे: आयटी कंपन्यांना कर्मचारी वाहतुकीची सेवा देणाऱ्या ‘निवाता सिस्टम्स’ कंपनीच्या चालकांनी कंपनीविरुद्ध खराडी आणि हिंजवडी परिसरात राडा घातला. कंपनीने चालू पॅकेजपेक्षा जास्त पैसे वाढवून द्यावेत, अन्यथा कंपनीच्या गाड्या फोडून टाकू अशी धमकी देत या चालकांनी इतर चालकांना गाड्या चालवण्यापासून रोखले. इतकेच नव्हे, तर कंपनीच्या महिला संस्थापिका व अधिकाऱ्यांना भररस्त्यात अश्लील शिवीगाळ करत धमकावले. हा सर्व प्रकार २४ जून २०२६ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते २५ जून २०२६ रोजी पहाटे एकच्या दरम्यान खराडीतील डब्ल्युटीसी टॉवर आणि हिंजवडी विप्रो सर्कल परिसरात घडला. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुरज विठ्ठल भोसले, सागर शिवलाल पेशोदे, वैभव रामदास जाधव, शैलेश संतोष स्वामी, अमोल दिगंबर नामपल्ले, सुमित शेषराव राठोड, आकाश बाळू भाले, दीपक देवराम येलभार, आशिष संजय कांबळे, शुभम राजेंद्र दिघे, किशोर बिभीषण मोरे, करण नितीन यादव, भागवत दयानंद खोमाने, अंकुश संजय गिरी, तुकाराम भाऊराव शेळके, विजय गजानन चव्हाण, आशिष लक्ष्मण दाभाडे, शाहीद अलिफ शेख या सर्व कंत्राटी कॅब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अतुल पांडुरंग सावेकर (वय ४८, रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२६, १८९, १९०, १९१(१), ६१(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ‘निवाता सिस्टम्स प्रा. लि.’ या कंपनीत व्यवस्थापकीय पदावर कार्यरत आहेत. या कंपनीकडे कंत्राट तत्त्वावर काम करणाऱ्या आरोपी चालक एकत्र आले.
२४ जून रोजी या चालकांनी खराडी येथील डब्ल्युटीसी टॉवर आणि अॅप्टीया कंपनीच्या गेटसमोर कंपनीच्या वतीने नियमित सेवा देणारे कॅब चालक विशाल गरड आणि अनिकेत धोंडीराम बंडगर यांच्या गाड्या बेकायदेशीररित्या रस्त्यात अडवल्या. “कंपनीने आम्हाला सध्या चालू असलेल्या दरापेक्षा जास्त वाढीव पॅकेज दिले पाहिजे, नाहीतर आम्ही एकाही गाडीचे ट्रिप होऊ देणार नाही. गाड्या चालवल्या तर त्या जागेवरच फोडून टाकू,” अशी धमकी देत त्यांनी भररस्त्यात मोठमोठ्याने आरडाओरडा केला.
यानंतर हिंजवडी येथील विप्रो सर्कल येथेही जात गाड्या अडवून दहशत माजवली. कंपनीच्या संस्थापिका कविता रामचंद्रा गौडा आणि इतर चालकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत गंभीर परिणामांची धमकी दिली. आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या वाहतूक व्यवस्थेला खिळ बसवून दहशत निर्माण करणाऱ्या या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.
18 IT Cab Drivers Booked for Allegedly Blocking Vehicles, Threatening Vandalism in Pune
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी