आमदारांच्या देहविक्रीच्या विधानावरून राज ठाकरे यांच्यावर हक्कभंग, राम कदम यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील फाेडाफाेडीच्या राजकारणावर संताप व्यक्त करताना आमदारांना देहविक्रीची उपमा देणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. यावरून त्यांच्यावर विधानसभेत हक्कभंग येऊ शकताे असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी दिला आहे. “आज प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकल्या जाणाऱ्यांचा आहे. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं तयार आहेतच,” अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती

ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रासह देशात सध्या सुरू असलेले पक्षफोडीचे राजकारण अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारा आहे.”



राज ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही थेट निशाणा साधला. “देशात भाजप आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे टिकून आहे. मात्र महाराष्ट्रात आणि देशात जे फोडाफोडीचे व घाणेरडे राजकारण सुरू आहे, त्यामागे अमित शहा यांची रणनीती आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नसतो. आज सत्ता आहे म्हणून जे सुरू आहे, त्याचे परिणाम उद्या भाजपलाही भोगावे लागतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार राम कदम यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राज ठाकरे यांच्या विधानामुळे हक्कभंगाचा विषय निर्माण होऊ शकतो. त्यांनी केलेले वक्तव्य लोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन करणारे आहे.”

“माझ्या मनात राज ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे मी स्वतः हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार नाही. पण त्यांच्या वक्तव्याचे स्वरूप तसे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

राम कदम म्हणाले, “जर जनतेला पक्षांतराचा राग असता, तर पक्ष बदलणारे लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून आले नसते. २०-२० लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आणि खासदार पक्ष बदलतात, त्यामागे काही ना काही कारण असते. एखादा कॅबिनेट मंत्री सत्ता सोडून विरोधात जातो, अशी उदाहरणे फार कमी आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा निवडून आले, याचा अर्थ जनतेने त्यांना स्वीकारले आहे.”
“राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यामागे उद्धव ठाकरे यांनी केलेला छळ हेच प्रमुख कारण होते,” असा दावा राम कदम यांनी यावेळी केला.

Raj Thackeray Faces Privilege Motion Over ‘Prostitution’ Remark Against MLAs, Ram Kadam Issues Warning

महत्वाच्या बातम्या