Pandharpur : ४० वारकरी एकत्र या, थेट पंढरपूरला एसटी मिळवा! आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाची विशेष योजना

विशेष प्रतिनिधी

पंढरपूर: Pandharpur आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा विशेष नियोजन केले आहे. याच अनुषंगाने, ४० वारकरी एकत्र आल्यास त्यांच्या गावातून किंवा जवळच्या ठिकाणाहून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी मोठी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.Pandharpur

पंढरपूर येथील एसटी बसस्थानकाची पाहणी आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यंदाच्या वारीत भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला असून राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.Pandharpur



मंत्र्यांनी सांगितले की, यंदा तब्बल ५,५०० विशेष एसटी बस वारीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. या बसच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांतून वारकऱ्यांना पंढरपूरला आणले जाईल आणि दर्शनानंतर सुरक्षितपणे परतही सोडले जाईल. या सेवेसाठी ११ हजार चालक आणि वाहक चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

भाविकांची गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी पंढरपुरात चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात आली आहेत. यामुळे बस वाहतुकीवरील ताण कमी होऊन वारकऱ्यांना कमी वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. बसस्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय मदत, माहिती केंद्रे आणि सुरक्षा व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यंदाच्या वारीत प्रथमच एसटी महामंडळाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वारीच्या काळात उत्कृष्ट, प्रामाणिक आणि प्रवाशाभिमुख सेवा देणाऱ्या चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांचे ‘प्रगती पुस्तक’ (परफॉर्मन्स रेकॉर्ड) तयार केले जाणार असून त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वारकऱ्यांना एसटी प्रशासनाशी समन्वय साधून प्रवास करण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही अडचणीसाठी नियंत्रण कक्ष आणि स्थानिक एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.

40 Warkaris? Get a Direct ST Bus to Pandharpur

महत्वाच्या बातम्या