‘पक्षासाठी जीव लावून काम केलेय, निर्णय मात्र राष्ट्रीय नेतृत्वाचा’, खडसे यांच्या भाजप पुनरागमनावर मुनगंटीवारांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

मुंबई: माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी मोठे योगदान दिले असून, ते पुन्हा पक्षात आले तर त्यांचे स्वागतच होईल, मात्र अंतिम निर्णय राष्ट्रीय नेतृत्व घेईल, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले . Khadse

एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपमध्ये परतण्याची ऑफर दिल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, “भारतीय जनता पक्ष वाढवण्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांचा मोठा वाटा आहे. त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी जीव लावून काम केले. काही अडचणी निर्माण झाल्या, पण पक्ष विस्तारात त्यांची भूमिका नाकारता येणार नाही.”

अमित शहा आणि खडसे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची मला माहिती नाही. मात्र मी प्रदेशाध्यक्ष असताना खडसे विरोधी पक्षनेते होते. ते जानदार आणि शानदार व्यक्तिमत्त्वाचे नेते होते. कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता आणि आजही अनेक कार्यकर्ते त्यांचा आदर करतात. ते पक्षाबाहेर गेले तेव्हा मला वैयक्तिकरित्या वाईट वाटले होते. पक्ष हजारो कार्यकर्त्यांच्या मेहनतीने वाढतो, पण आपल्या घरातील माणसे बाहेर जाणे आनंदाची बाब नसते. आता ते परत आले तर निश्चितच त्यांचे स्वागत केले जाईल. मात्र त्यांच्या प्रवेशाबाबत अंतिम निर्णय पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्वच घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.



राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर बोलताना मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व करत आहेत. त्यांनी राज्यासाठी मोठे काम केले आहे. त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, ही आमची इच्छा आहे,” असे ते म्हणाले.

बच्चू कडू, संजय राऊत आणि इतर नेत्यांकडून विविध नावांची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा होत असल्याबाबत ते म्हणाले, “लोकशाहीत प्रत्येकाला आपला आवडता नेता असतो. सोशल मीडियावर तर 20 ते 25 जणांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. इच्छा व्यक्त करणे चुकीचे नाही, मात्र पक्षाचा निर्णय सर्वांसाठी अंतिम असतो.”

उद्धव ठाकरे नागपुरातील राम मंदिरात आंदोलन करणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, “राम मंदिर कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नाही. प्रभू राम हे संपूर्ण देशाचे आहेत. उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा कोणताही नागरिक रामाचे नाव घेऊ शकतो आणि मंदिरात जाऊ शकतो. मंदिरात जाण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. प्रभू राम हे भारताच्या आस्थेचे, अस्मितेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. रामाचे नाव घेतल्याने समाजात सकारात्मकता आणि समाधान निर्माण होते. धार्मिक स्थळांचा वापर राजकीय वादासाठी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘Khadse devoted his life to the party; final decision rests with national leadership,’ says Mungantiwar on BJP return

महत्वाच्या बातम्या