पतीचे ३ तुकडे करून ११ महिने लपवली हत्या ; पत्नी व प्रियकर अटकेत

विशेष प्रतिनिधी

ऐरोली :- ऐरोलीतील सुनिता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल प्रजापती यांनी पती बलीराम कुशवाह यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तीन तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तब्बल ११ महिने हा गुन्हा लपवून ठेवला होता. मात्र, पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लावत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

९ऑगस्ट २०२५ च्या रात्री बलीराम गाढ झोपेत असताना सुनिता आणि राहुल यांनी त्यांचा गळा आवळला. त्यानंतर धारदार चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केल्याचं तपासात समोर आले आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घरातच बलीरामच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. त्यांनी मुंडकं, धड आणि पाय कापून तिन्ही तुकडे वेगवेगळ्या गोण्या आणि चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील दाट झाडीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

हत्येनंतर सुनिताने यादव नगरमधील आपलं घर भाड्याने देऊन मुलांसह राहुलसोबत घणसोली येथे राहण्यास सुरुवात केली. जवळपास आठ महिन्यांनंतर बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने भावाबाबत चौकशी केली. तेव्हा सुनिताने भांडण करून घर सोडून गेला, असं सांगून वेळ मारून नेली. मात्र संशय वाढल्याने त्यांनी एप्रिल 2026 मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलीराम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.


बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन


बेपत्ता असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर सुनिता आणि राहुल यांनी जुने मोबाईल आणि सिमकार्ड बदलून नवे हँडसेट वापरण्यास सुरुवात केली. मात्र तांत्रिक तपासादरम्यान राहुलचे वेगवेगळ्या क्रमांकांवरून केवळ सुनिताशीच सातत्याने संपर्क होत असल्याचे कॉल रेकॉर्ड मधून समोर आले. याशिवाय सुनिता प्रत्येक चौकशीत पतीबाबत वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच अधिक तीव्र झाला . अखेर पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली असता, त्यांच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर कसून चौकशी केली गेली. दोघांनीही थरारक हत्येची कबुली दिली.

अनैतिक संबंध कळताच, रचला हत्येचा कट

मिळालेल्या माहितीनुसार, मयत बलीराम कुशवाह हे ऐरोलीच्या यादव नगर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. दरम्यान, सुनिता हिचे घणसोली येथे राहणारा रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी अनैतिक संबंध जुळले होते. या संबंधांची माहिती बलीराम यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे पतीला कायमचा मार्गातून दूर करण्याचा कट सुनिता आणि राहुल यांनी रचला होता. हा कट यशस्वी करण्यासाठी सुनिताने आधी दोन्ही मुलांना दोन दिवसांसाठी मावशीकडे पाठवले.

Husband’s body chopped into three pieces; murder concealed for 11 months; wife and lover arrested.

महत्वाच्या बातम्या