ठाकरे गटातून शिंदेंकडे येणाऱ्यांचा ओघ कायम राहणार, उदय सामंत यांचा उध्दव ठाकरेंना इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे गटातून शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ कायम राहणार असून ‘ऑपरेशन टायगर’ हा शब्द वापरण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहील, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी दिला Uday Samant

पत्रकार परिषदेत बाेलताना उदय सामंत म्हणाले की, ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे. अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी आमदार, माजी खासदार आणि महाविकास आघाडीतील काही आमदारही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ऑपरेशन वन, टू किंवा थ्रीवर आम्ही थांबणार नाही. पुढेही अनेक राजकीय घडामोडी घडतील.

दिल्लीतील जंतरमंतरवर सोनम वांगचूक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यावर सामंत म्हणाले, “आज आंदोलनाचा सोळावा दिवस आहे आणि त्यांनी फार लवकर पाठिंबा जाहीर केला. देशातील युवक, शेतकरी, कामगार आणि उद्योजकांसाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. त्यामुळेच देशात एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती सरकारला जनतेने पुन्हा सत्ता दिली आहे.

रामरक्षा आंदोलन, नागपुरातील कार्यक्रम किंवा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांना आता अनेक वर्षांनंतर सुचला आहे. काँग्रेससोबत इतकी वर्षे राहिल्यानंतर त्यांना हिंदुत्वाची आठवण झाली, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असा टाेला त्यांनी उध्दव ठाकरेंना मारला.



‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळल्याच्या मुद्द्यावर सामंत म्हणाले की, केवळ वगळलेल्या नावांची चर्चा केली जाते, पण कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे, याकडे कोणी लक्ष देत नाही. काही ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते, तर काही पुरुषांनीही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतल्याचे आढळले. अशा आक्षेपार्ह आणि नियमबाह्य अर्जांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पात्र असलेल्या कोणत्याही महिलेला योजनेतून वगळलेले नाही.

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्या टीकेबाबत बोलताना सामंत यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. “कन्हैया कुमार अजूनही कुमारच आहे. तो अपरिपक्व आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आणि ब्रेकिंग न्यूजमध्ये राहण्यासाठी तो वाटेल त्या स्तरावर जाऊन टीका करतो. ही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी पद्धत नाही,” अशी टीका त्यांनी केली.

राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावल्याच्या प्रश्नावर सामंत म्हणाले की, एखादी याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने खुलासा मागवणे ही नियमित न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे त्या विषयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

Flow of leaders from Thackeray camp to Shinde will continue, says Uday Samant

महत्वाच्या बातम्या