Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिला वगळल्या; ई-केवायसी न करणाऱ्या ६० लाख महिलांचा सर्वाधिक वाटा, आदिती तटकरे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Aditi Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी संख्येत मोठी घट झाल्याच्या चर्चांवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली. अंतिम ई-केवायसी (E-KYC), विविध विभागांकडून करण्यात आलेली डेटा पडताळणी आणि पात्रतेच्या निकषांची छाननी पूर्ण झाल्यानंतर सुमारे ९२ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामागे ई-केवायसी अपूर्ण राहणे, आयकरदाते असणे, उत्पन्न मर्यादा ओलांडणे आणि चारचाकी वाहन मालकी यांसारखी कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Aditi Tatkare :

तटकरे म्हणाल्या की, ऑगस्ट २०२५ पासून लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. तसेच अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी एप्रिल २०२६ पर्यंत मुदत आणि प्रशासनाकडून आवश्यक सहकार्यही उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, वारंवार संधी देऊनही अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांना लाभार्थी यादीतून वगळावे लागले.Aditi Tatkare :



अंतिम छाननीनंतर खालील कारणांमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

ई-केवायसी न केलेल्या महिला : सुमारे ६० लाख महिलांनी सहा महिन्यांची मुदत आणि अतिरिक्त वेळ मिळूनही ई-केवायसी पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ देता आला नाही.

आयकरदाते कुटुंबे : आयकर विभागाच्या पडताळणीत सुमारे ५ लाख महिलांचे कुटुंब आयकर भरत असल्याचे आढळले. योजनेच्या निकषांनुसार अशा लाभार्थींना अपात्र ठरविण्यात आले.

उत्पन्न मर्यादा ओलांडणारे कुटुंब : ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आढळले, अशा १४ ते १५ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले.
चारचाकी वाहन मालकी : कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे आढळलेल्या साडेचार ते पाच लाख महिलाही पात्रतेच्या निकषात बसत नसल्याने अपात्र ठरल्या.

ई-केवायसी पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या प्रकरणांची पडताळणी

तटकरे यांनी स्पष्ट केले की, काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही, अशा तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा सर्व प्रकरणांची प्रशासनाकडून युद्धपातळीवर पडताळणी सुरू असून, पात्र महिलांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

बीड जिल्ह्यातील २८ लाख महिला अपात्र ठरल्याची चर्चा दिशाभूल करणारी

बीड जिल्ह्यात तब्बल २८ लाख महिला अपात्र ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सुरू होती. या दाव्याचे खंडन करताना अदिती तटकरे म्हणाल्या की, बीड जिल्ह्याबाबत पसरविण्यात येत असलेली माहिती पूर्णपणे तथ्यहीन असून अशा कोणत्याही आकडेवारीला अधिकृत आधार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

लाभार्थी संख्येत घट का झाली?

योजनेच्या आकडेवारीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करताना तटकरे यांनी सांगितले की, सुरुवातीला २ कोटी ६३ लाख महिलांनी नोंदणी केली होती. प्राथमिक छानणीनंतर २ कोटी ४३ लाख ते २ कोटी ४७ लाख महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र, त्यानंतर ई-केवायसी, विभागनिहाय डेटा पडताळणी आणि अंतिम पात्रता तपासणी झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी झाली.

सध्या अंतिम यादीत १ कोटी ६७ लाख ते १ कोटी ७० लाख महिला पात्र ठरल्या असून, शासनाने वितरित केलेल्या शेवटच्या हप्त्यात १ कोटी ६७ लाख महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे सन्मान निधी जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तटकरे यांनी स्पष्ट केले की, योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा, यासाठी संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, चुकीने वगळल्या गेल्याचा दावा करणाऱ्या लाभार्थी महिलांच्या तक्रारींची स्वतंत्रपणे तपासणी केली जात आहे.

92 lakh women dropped from Ladki Bahin scheme; 60 lakh excluded for failing e-KYC, says Aditi Tatkare

महत्वाच्या बातम्या