Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला कायदेशीर आव्हान; राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Sunetra Pawar दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीला पक्षातीलच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर आव्हान दिले आहे. यासंदर्भात त्यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावल्याने पक्षात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.Sunetra Pawar

९ जुलै रोजी पाठविण्यात आलेल्या या नोटिशीत सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी करण्यात आली आहेSunetra Pawar



नोटिशीनुसार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पक्षाच्या नियमांनुसार आणि कायदेशीर निकषांनुसार झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही निवड रद्द करून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी वैध मानू नये, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

जानेवारीमध्ये विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली. त्यानंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सध्या पार्थ पवार आणि जय पवार हे देखील पक्षाच्या कामकाजात सक्रिय असून, पक्षाच्या पुढील वाटचालीत पवार कुटुंबाची महत्त्वाची भूमिका आहे.

या नोटिशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्यानेही राजकीय चर्चांना वेग आला होता. त्यानंतर पक्षांतर्गत बैठक घेऊन मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आता अध्यक्षपदाच्या निवडीवरच कायदेशीर प्रश्न उपस्थित झाल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

सच्चिदानंद सिंह यांनी नेमक्या कोणत्या कायदेशीर किंवा प्रक्रियात्मक त्रुटींच्या आधारे ही नोटीस पाठवली आहे, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. संबंधित पक्षांकडून यावर अधिकृत भूमिका मांडली जाण्याची प्रतीक्षा असून, या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar’s appointment as NCP national president faces legal challenge

महत्वाच्या बातम्या