जगातील सर्वात मोठी रिटेल रिअल टाइम पेमेंट सिस्टम, आयएमएफकडून भारताच्या यूपीआयला जागतिक बहुमान

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नाणेनिधी अर्थात आयएमएफने भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस UPI ला जगातील सर्वात मोठी रिटेल फास्ट पेमेंट सिस्टम म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. जून 2025 च्या ‘ग्रोइंग रिटेल डिजिटल पेमेंट्स, द व्हॅल्यू ऑफ इंटरऑपरेबिलिटी’ या अहवालात ही नोंद करण्यात आली आहे. यामुळे तत्काळ डिजिटल व्यवहारांच्या जगात यूपीआयचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आयएमएफच्या अहवालानुसार, UPI ने तब्बल 129.3 अब्ज रिअल टाइम पेमेंट्स प्रक्रिया केली, जी संपूर्ण जगातील तात्काळ व्यवहारांच्या एकूण संख्येच्या 49 टक्के आहे. ACI वर्ल्डवाईडच्या 2024 च्या अभ्यासानुसार UPI स्पर्धक देशांपेक्षा खूप पुढे आहे. ब्राझीलचा Pix सिस्टम फक्त 14 टक्के व्यवहारांसह दुसऱ्या क्रमांकावर, थायलंडचे PromptPay 8 टक्के, चीन 6 टक्के आणि दक्षिण कोरिया 3 टक्क्यांवर आहे.

नोव्हेंबर 2025 मध्ये UPI ने 19 अब्ज व्यवहारांचा टप्पा पार केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 23 टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारात UPI किती खोलवर रुजला आहे हे स्पष्ट होते.

केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत ही माहिती देताना सांगितले की, सरकार, रिझर्व्ह बँक आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारताने ही ऐतिहासिक झेप गाठली आहे.

सरकारने BHIM UPI च्या लो-वॅल्यू व्यवहारांवरील प्रोत्साहन योजना, तसेच पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF) सारखे अनेक उपक्रम राबवले आहेत. PIDF अंतर्गत 2024-25 मध्ये 6.5 कोटींपेक्षा अधिक व्यापार्‍यांना 56.86 कोटी QR कोड्स देण्यात आले आणि टियर 3 ते टियर 6 शहरांमध्ये 5.45 कोटी डिजिटल टच पॉईंट्स उभारण्यात आले.

RuPay-UPI चा वापर सार्वजनिक सेवा, वाहतूक आणि ई-कॉमर्समध्ये वाढवण्यामुळे देशभरात डिजिटल पेमेंट्स अधिक सुलभ झाली असून रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात डिजिटल व्यवहार पोहोचवून आर्थिक समावेशनाला मोठी चालना मिळाली आहे.

भारताची UPI प्रणाली आज जागतिक स्तरावर एक मानक आणि मॉडेल म्हणून पाहिली जात आहे. आयएमएफच्या या मान्यतेमुळे डिजिटल इंडिया मोहिमेच्या यशावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

IMF awards India’s UPI global honour as world’s largest retail real-time payment system

महत्वाच्या बातम्या