सुप्रिया सुळे यांच्या आराेपांना अमितेश कुमार यांचे गुन्हेगारीची आकडेवारी मांडत उत्तर, गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सविस्तर आकडेवारी सादर करत या आरोपांना उत्तर दिले आहे. नऊ पानी पत्राद्वारे त्यांनी पुण्यातील गुन्हेगारीचे वास्तव चित्र मांडत गेल्या काही वर्षांत बहुतांश गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा केला आहे.

अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ ते २०२५ या कालावधीत पुणे शहरातील बहुतांश प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. खून आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांत सुमारे २७ टक्के घट झाली असून साखळी चोरीच्या घटनांमध्ये ५५ टक्के, घरफोडीत ३६ टक्के, दरोड्यात २४ टक्के आणि चोरीच्या घटनांमध्ये २४ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये ७ टक्के तर विनयभंगाच्या घटनांमध्ये १ टक्का घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. वाहन चोरीच्या घटनांमध्येही ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

अलीकडील काही गाजलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असली, तरी त्या काही स्वतंत्र घटना असून संपूर्ण शहरातील गुन्हेगारी परिस्थितीचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. २०२५ मध्ये अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत घडलेल्या चार गंभीर घटनांमुळे गुन्हेगारी वाढल्याचे चित्र निर्माण झाले, मात्र एकूण आकडेवारी वेगळे वास्तव दर्शवित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पोलीस आयुक्तांनी गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या तातडीच्या प्रतिसादाचाही उल्लेख केला. काही प्रकरणांत पोलिसांनी घटनास्थळी वेळीच पोहोचून जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून दिली. “गोल्डन अवर”मध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचा दावा त्यांनी केला.



पुण्याला “गुन्हेगारीची राजधानी” म्हणून संबोधणे चुकीचे असल्याचे सांगताना अमितेश कुमार यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB)च्या आकडेवारीचा दाखला दिला. देशातील १९ प्रमुख महानगरांमध्ये दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रमाणात पुण्याचा क्रमांक १६ वा असून एकूण IPC, BNS आणि विशेष कायद्यांतील गुन्ह्यांच्या बाबतीत पुणे १५ व्या क्रमांकावर आहे. खुनाच्या गुन्ह्यांमध्ये पुण्याचा क्रमांक ११ वा असल्याचे त्यांनी नमूद केले.

संघटित गुन्हेगारीविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्रमुख टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत टोळी संघर्षातून एकही खून झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला. अमली पदार्थांविरोधातही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“कोयता गँग” या चर्चित विषयावर भाष्य करताना अमितेश कुमार म्हणाले की, सोशल मीडियावर निर्माण झालेल्या प्रतिमेप्रमाणे पुण्यात कोणतीही स्वतंत्र “कोयता गँग” कार्यरत नाही. धारदार शस्त्रांचा वापर करून काही गुन्हे घडले असले, तरी पोलिसांच्या कारवाईमुळे अशा घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

महिलांच्या सुरक्षेबाबतही पोलिसांनी विविध उपाययोजना राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये घट झाली असून शहरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आणि आधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.

अमितेश कुमार यांनी शेवटी नागरिक आणि लोकप्रतिनिधींना सोशल मीडियावरील अपूर्ण माहिती किंवा काही निवडक घटनांच्या आधारे निष्कर्ष काढू नयेत, असे आवाहन केले. पुणे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Amitesh Kumar rebuts Supriya Sule’s crime allegations with data, claims crime rate declining in Pune

महत्वाच्या बातम्या