रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अंजली दमानिया मैदानात, राजीनाम्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांचे खरातांसोबतचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.दमानिया यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अंजली दमानिया यांनी अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांचे एकत्रित फोटो ट्विट केले आहेत. भोंदू बाबा’ला कोणाचे अभय होते, असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे. या फोटोंमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ह्या रुपाली चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी सुद्धा दमानिया यांनी केली आहे.



दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त असून, अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने नाव कमावले होते. मात्र, या गंभीर आरोपांनंतर त्याची प्रतिमा पूर्णपणे डागाळली असून, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

अशोक खरातच्या अटकेनंतर या प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, संबंधित अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहून शासनाने हा तपास सीआयडी (CID) आणि एसआयटी (SIT) कडे सोपवला आहे. या तपासातून खरातच्या अफाट संपत्तीचे आणि त्याच्या जाळ्यात अडकलेल्या इतर बड्या नावांचे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Anjali Damania Steps Up Against Rupali Chakankar, Demands Resignation”

महत्वाच्या बातम्या