विशेष प्रतिनिधी
पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट 2026 पेपरफुटी प्रकरणातील तपास दिवसेंदिवस अधिक गडद होत असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) महाराष्ट्रातून आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी (APMA) येथील भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह याचा समावेश असून, या अटकेमुळे पुण्यातील कोचिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील आरोपी मनीषा हवालदार यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे हाती लागले. हवालदार आणि तिच्या पतीचे मोबाईल जप्त करून त्यांचा फॉरेन्सिक तपास करण्यात आला. यावेळी “GOD” नावाने सेव्ह केलेला एक मोबाईल क्रमांक तपास यंत्रणांच्या रडारवर आला. पुढील चौकशीत हा क्रमांक तेजस शाह याचा असल्याचे निष्पन्न झाले. NEET paper leak case
मोबाईलमधील चॅट, हस्तलिखित नोट्स आणि डिजिटल पुराव्यांच्या तपासात भौतिकशास्त्र विषयाचे काही प्रश्न मिळून आले असून ते नीट परीक्षेच्या लीक प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मनीषा हवालदार हिने तेजस शाहला भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवण्यास सांगितले होते.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान तेजस शाहने संबंधित कागदपत्रे आणि काही पुरावे नष्ट केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात लातूर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांनाही सीबीआयने अटक केली आहे. रसायनशास्त्र विषयाची लीक प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांच्या मते, राज्यातील काही कोचिंग क्लासेस, मध्यस्थ आणि वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्तींचा या रॅकेटशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशभरात गाजत असलेल्या या पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी देशातील लाखो विद्यार्थी नीट परीक्षेवर अवलंबून असताना पेपरफुटीच्या आरोपांनी विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, पुणे, नाशिक, लातूर आणि अहिल्यानगरसह देशभरातील ४९ ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा तपासात दावा करण्यात येत असून, या संपूर्ण रॅकेटमागील मास्टरमाइंड कोण याचा शोध सीबीआय घेत आहे.
APMA teacher Tejas Shah arrested in NEET paper leak case
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश