सत्ता मिळवता आली नाही याची लाज वाटली पाहिजे, संजय राऊत काँग्रेसवर बरसले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : चंद्रपूर महानगरपालिकेत 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता मिळवता आली नाही, याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेसवर बरसले.

चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर भाजपला पाठिंबा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, अशी सातत्याने भूमिका मांडणाऱ्या ठाकरे गटाने चंद्रपूरमध्ये घेतलेली भूमिका काँग्रेसच्या टीकेचे कारण ठरली. मात्र, या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट काँग्रेसवर हल्ला चढवला.



राऊत म्हणाले, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. ज्यांनी पाठिंबा द्यायचा होता, त्यांनाही वेगळा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे शिवसेनेला दोष देण्यात अर्थ नाही. स्थानिक राजकारणातील गुंतागुंत आणि काँग्रेसमधील दोन गटांतील संघर्ष यामुळे सत्ता हातातून गेली. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने घेतलेला निर्णय हा परिस्थितीजन्य होता.

स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत जाऊ नका, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मुंबईत गेल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार या दोन गटांतील संघर्षामुळेच काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला, तरीही दोघांच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही.त्यामुळेच पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्यांनाही वेगळा निर्णय घ्यावा लागला, असे राऊत यांनी सांगितले.

‘Congress Should Feel Ashamed for Failing to Secure Power’: Sanjay Raut Launches Sharp Attack

महत्वाच्या बातम्या