Rupali Chakankar : राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच, वैष्णवी हगवणे प्रकरणावर रूपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच असते. पंतप्रधान मोदींपासून गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा मागितला जातो, अशा शब्दांत महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राजीनाम्याची मागणी होत असताना आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

नाशिकमध्ये ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत जनसुनावणीसाठी आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. रुपाली चाकणकर म्हणाल्या, “कोणत्याही कुटुंबातून आलेल्या तक्रारीकडे आम्ही सामोपचाराने पाहतो. कुटुंब एकत्र ठेवणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. गैरसमज दूर करून संवाद साधणं आणि कायद्यानुसार तीन वेळा काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं.” त्या पुढे म्हणाल्या की, “कुटुंबव्यवस्था टिकवणं हेच आमचं काम आहे; तोडणं नव्हे, जोडणं गरजेचं आहे

परिणय फुके प्रकरणासंदर्भात चाकणकर म्हणाल्या की, “या प्रकरणात महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. मात्र मीडियातून मिळालेल्या व्हिडिओंच्या आधारे नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आम्ही चौकशीची मागणी केली आहे. पीडित महिलेशी चार ते पाच वेळा संपर्क केला गेला आहे. जेव्हा तक्रार येते, तेव्हा आयोगाकडून कारवाई केली जाते.

स्थानिक पोलीस स्टेशन, भरोसा सेल आणि कौटुंबिक न्यायालयात तक्रार दिल्यानंतर जर न्याय मिळत नसेल, तर महिला आयोग तुमच्यासाठी आहे. आम्ही सर्व तक्रारी गांभीर्याने घेतो आणि आवश्यक ती कारवाई करतो. तुम्ही पाठपुरावा करा, आयोग तुमच्या न्यायासाठी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

Demanding resignation is the role of the opposition, Rupali Chakankar response to the Vaishnavi Hagawane case

महत्वाच्या बातम्या