बालाजीनगर हल्ला प्रकरणी २४ तासांत ५ आरोपींना कार्ला येथून बेड्या, आंदेकर खून प्रकरणाच्या वैमनस्यातून टोळीयुद्ध!

विशेष प्रतिनिधी

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर यांच्या खुनाचा बदला आणि वर्चस्वाच्या वादातून धनकवडीतील बालाजीनगर भागात बुधवारी (२० मे) सकाळी थरारक गोळीबार करण्यात आला. आंदेकर खून प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ अक्षय उर्फ बाळू म्हस्के याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला होता. या संवेदनशील गुन्ह्यातील ५ सराईत आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने अवघ्या २४ तासांत लोणावळ्याजवळील कार्ला (एकविरा देवी रस्ता कमान) येथून शिताफीने अटक केली आहे.

आवेज अशपाक शेख (वय २६, रा. २७१, गणेश पेठ, अजय सी फूड शेजारी), अमन फारुख बागवाले (वय २१, रा. गोल्डन ग्रेस, भारत टॉकीज जवळ, भवानी पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय १९, रा. ६०, भवानी पेठ, पालखी विठोबा चौक), ऋषिप्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. हमाल तालीम, नाना पेठ, नवरंग मित्र मंडळाजवळ), आफ्ताब शरीफ सय्यद (वय २२, रा. भाग्योदय नगर, वैशाली नर्सिंग होम शेजारी, कोंढवा खुर्द) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यात अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६, रा. पुणे) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा भाऊ आकाश म्हस्के हा आंदेकर खून प्रकरणात सध्या तुरुंगात आहे.

बुधवार सकाळी १० च्या सुमारास अक्षय म्हस्के हा बालाजीनगरमधील राजर्षी शाहू बँक चौकात एका रिक्षात बसला होता. त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या आरोपींनी भरचौकात त्याच्यावर पिस्तूलमधून थेट गोळ्या झाडल्या, तसेच धारदार कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे धनकवडी परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

घटनेचे गांभीर्य पाहून गुन्हे शाखेचे युनिट-१ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव आणि त्यांच्या तपास पथकाने तातडीने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणावरून या गुन्ह्यात ‘ऋषिप्रसाद आंबट’ हा सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने त्याच्या वडिलांकडे कसून चौकशी केली असता, ऋषिप्रसाद हा त्याच्या इतर साथीदारांसह लोणावळा परिसरात पळून गेल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली.



गुन्हे शाखेचे पथक तात्काळ लोणावळ्याकडे रवाना झाले. आरोपींचा शोध घेत असताना, ते पुणे-मुंबई महामार्गावरील वेहेरगाव-कार्ला येथील एकविरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीजवळ येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या भागात वेषांतर करून सापळा रचला. काही वेळातच आरोपी आवेज आश्पाक शेख हा त्याच्या इतर साथीदारांसह तिथे पोहोचला. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून या सर्वांना जागीच ताब्यात घेतले.

आरोपींनी वैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या लढाईतून हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे. गुन्हे शाखेने पुढील कायदेशीर कारवाईसाठी सर्व आरोपींना सहकारनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेंद्र संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक (युनिट-१) अजित जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (युनिट-२) अश्विनी जगताप यांच्या सूचनेनुसार पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयूर भोसले, सुहास डोंगरे, निलेश साबळे, युवराज कांबळे, उमेश मठपती आणि अविनाश दळवी यांनी मोलाची भूमिका बजावली.

Five accused arrested from Karla within 24 hours in Balajinagar attack case; gang war linked to Andekar murder rivalry”

महत्वाच्या बातम्या