Gautami Patil : गौतमी पाटील लाडकी बहीण, सरकारी योजनेवर आता मराठी चित्रपट

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर आता मराठी चित्रपट येणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Gautami Patil

नुकताच या चित्रपटाचा साताऱ्यात मुहूर्त पार पडला. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला.

या चित्रपटाची कथा राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ या उपक्रमावर आधारलेली असणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिक बळकटी देण्यात आली आहे. चित्रपट केवळ माहितीपर नसून, तो संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाने परिपूर्ण असा अनुभव देईल, असे निर्मात्यांनी सांगितले. एक गंभीर आणि समाजासाठी महत्त्वाचा विषय हलक्याफुलक्या शैलीत मांडत एक प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर उभी करण्याचा प्रयत्न यातून होणार असल्याचे मत दिग्दर्शकांनी व्यक्त केले.



या चित्रपटात गौतमी पाटील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तिच्या सोबतीला अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर हे असणार आहेत. या दोघांची जोडी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. ‘लाडकी बहीण’ चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म व शुभम फिल्म प्रॉडक्शन यांनी एकत्रित केली आहे. शीतल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद शीतल शिंदे हिने केले, तर गणेश शिंदे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचे सुमारे दोन कोटींहून अधिक महिला लाभार्थी आहेत. या महिलांना आतापर्यंत 9 महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.

Gautami Patil’s Ladki Bahin, now Marathi films on government scheme

महत्वाच्या बातम्या