लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असलेल्या हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी थेट शासकीय निधीचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारने संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. Ladki Bahin Yojana

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक महिलांना याचा थेट आर्थिक आधार मिळाला. मात्र याच काळात नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्ज मंजूर झाल्याचा प्रकार आता समोर आला आहे.



आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, किमान 12,900 पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. नियमांनुसार नियमित वेतन घेणारे सरकारी कर्मचारी या योजनेसाठी अपात्र आहेत. असे असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दरमहा 1,500 रुपये जमा करण्यात आले. महिला व बालविकास विभागाने दिलेल्या अधिकृत उत्तरात 12,915 सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत पैसे देण्यात आल्याचे मान्य करण्यात आले आहे.

यापूर्वी सरकारकडून सुमारे 2,400 सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र RTI मधून समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार हा आकडा पाच पटीहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे योजनेतील तपासणी आणि अर्ज मंजुरी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महिला व बालविकास विभागाने आपल्या उत्तरात संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात त्यांच्या विभागांना कारवाईचे आदेश दिल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, सरकारकडून सध्या लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पुन्हा एकदा छाननी सुरू आहे. निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द केले जात असून पुढील काळात चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana funds in government employees’ accounts; RTI reveals major irregularities

महत्वाच्या बातम्या