विशेष प्रतिनिधी
मुंबई : संतोष देशमुख प्रकरणावरून मंत्रिपदाचा राजीनामा मागत खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांना घेरले तर बेगड्या पवारांची बेगडी लेक असे म्हणून लक्ष्मण हाकेंनी बाण सोडले!!
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग मध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली त्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपुढे पदर पसरण्याचे वक्तव्य केले. नैतिकतेचा मुद्दा काढत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला.
मात्र सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताच ओबीसी नेते लक्ष्मण हाके संतापले त्यांनी बेगड्या पवारांची बेगडी लेक अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांचे वाभाडे काढले. शरद पवार बेगडी पुरोगामी नेते आहेत. सुप्रिया सुळे यांनी आज त्यांच्या छापाचे दर्शन घडविले. सुप्रिया सुळे यादेखील बेगडी पुरोगामी नेत्या आहेत. सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इतर जातींमधल्या हत्या दिसत नाहीत. त्याकडे त्या दुर्लक्ष करतात. रोहित पवार कर्जत जामखेड मधून फक्त १२०० मतांनी निवडून आलेत. पवार खानदानाला फक्त निवडून येण्याचे व्याकरण समजते. त्यांना बाकी कुठल्या विषयाशी देणे घेणे नाही. बीडमध्ये येऊन हे बेगडी लोक हत्येचे राजकारण करतात, असा टोला लक्ष्मण हाके यांनी हाणला.
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या गुप्त आणि उघड भेटीवरून महाराष्ट्रात राजकारण पेटले असताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे आणि वाल्मीक कराड यांच्या पहाटेच्या भेटीचा उल्लेख केला. सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत. ते एकमेकांना भेटले. पण मनोज जरांगे हा शून्य माणूस आहे. त्याने वाल्मीक कराडची पहाटे भेट का घेतली?? यातले सत्य महाराष्ट्राला समजले पाहिजे, असा तडाखा लक्ष्मण हाके यांनी लगावला.