खासदार फुटीच्या चर्चेमुळे ठाकरे गटात खडाजंगी; शरद पवारांना जागा सोडल्याने प्रियांका चतुर्वेदी बैठकीतून गेल्या निघून

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना ठाकरे गटात खासदार फुटीच्या चर्चेमुळे ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेमुळे ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र बैठकीत राज्यसभेच्या जागेचा विषय निघाला. शरद पवारांना जागा सोडल्याने प्रियांका चतुर्वेदी संजय राऊत यांना बोल लावत बैठकीतून निघून गेल्या.

बैठकीदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांवर नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “तुम्ही फुटणार असल्याचं बाहेर सांगितलं जातंय, पण मला तुमच्यावर विश्वास आहे. ही लढाई तुमच्या भरोशावर लढतोय. लढायचं नसेल तर स्पष्ट सांगा,” असे ते म्हणाले.



राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आल्यामुळे पक्षात नाराजी वाढल्याचे दिसून आले. माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बैठकीत उघडपणे नाराजी व्यक्त करत ही जागा सोडण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आणि संतापाच्या भरात बैठक सोडून निघून गेल्या.

बैठकीत खासदारांनी संघटनात्मक अडचणीही मांडल्या. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून पुरेसे पाठबळ मिळाले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. काही खासदारांनी आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरे वाढवावेत, अशी मागणीही केली.सूत्रांच्या माहितीनुसार, या सूचनांमुळे आदित्य ठाकरे नाराज असल्याचेही सांगितले जात आहे. एकूणच, पक्षात वाढत चाललेली अस्वस्थता आणि नेतृत्वावर होणारा दबाव यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब) मध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असल्याचे चित्र दिसत आहे.

MP Defection Buzz Sparks Clash in Thackeray Camp; Priyanka Chaturvedi Walks Out Over Seat to Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या