खासदार संजय राऊत यांना पोटाच्या कॅन्सरचे निदान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना पोटाच्या कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी हा आजार निष्पन्न झाल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या आजारपणाबाबत मोकळेपणाने भाष्य केले.

संजय राऊत गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याचे दिसून येत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि काही दिवस रुग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र, नेमका कोणता आजार आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते, समर्थक आणि राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण होते.

मुलाखतीत राऊत म्हणाले, “हो, मला कॅन्सर झाला आहे. त्यात घाबरण्यासारखे काय? दिवाळीच्या आधी मला पोटात कॅन्सर असल्याचे निदान झाले. माझे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी रक्ततपासणी केली आणि त्यातून हे स्पष्ट झाले. सध्या उपचार सुरू आहेत. काही सर्जरी अजून व्हायच्या आहेत, पण त्या होतील. मी यातून बाहेर पडण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे.”
गंभीर आजार असूनही संजय राऊत यांनी राजकीय सक्रियता कायम ठेवली आहे. जेव्हा शक्य झाले, तेव्हा ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि राजकीय लढ्यांमध्ये सहभागी झाले. “शरीरात शस्त्रक्रिया होतात, त्या स्वीकाराव्याच लागतात. हा देखील माझा वैयक्तिक लढा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, राऊत आजारी असल्याची माहिती समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

MP Sanjay Raut Diagnosed With Stomach Cancer

महत्वाच्या बातम्या