ओमराजे निंबाळकरांचा संभ्रम कायम; ‘20 जूननंतरच भूमिका स्पष्ट करणार’, ठाकरे गटातील फुटीला नवे वळण

विशेष प्रतिनिधी

मुंबई/धाराशिव: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना नवे परिमाण मिळाले आहे. आपण अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसून 20 जून रोजी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच आपली भूमिका जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. Omraje Nimbalkar

माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. सध्या माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण सर्वात महत्त्वाचे आहे. या प्रकरणाचा निकाल 20 जून रोजी लागणार आहे. त्यानंतरच माझी पुढील भूमिका स्पष्ट करेन.” त्यांनी आपण सध्या दिल्लीत नसून पुण्यात असल्याचेही सांगितले.

यामुळे ठाकरे गटाने दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या तातडीच्या बैठकीसह बंडखोर खासदारांच्या बैठकीतही ते सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी ते नेमके कोणत्या भूमिकेत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची बंडखोर

खासदारांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे संताप व्यक्त केला असून, उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजकीय संधीची आठवण करून देत पक्षत्याग केल्यास तो विश्वासघात ठरेल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या खासदारांकडून स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. चर्चेत असलेल्या नावांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नऊ खासदारांना संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या खासदारांविरोधात पुढील कारवाईसाठी हा आधार ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.



मात्र, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठीचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे व्हीप जारी होण्याच्या एक दिवस आधीच सादर केले होते. त्यामुळे ठाकरे गटाचा व्हीप कायदेशीरदृष्ट्या कमकुवत ठरू शकतो.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे म्हणाल्या, “बंडखोर खासदारांचे पत्र कालच लोकसभा अध्यक्षांकडे पोहोचले होते. आम्ही आज व्हीप काढला. त्यामुळे आमचा व्हीप तांत्रिकदृष्ट्या प्रभावी राहणार नाही, अशी माहिती मिळत आहे.”

दरम्यान, ठाकरे गटाने आणखी एक दावा करत लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रावरील सहा पैकी दोन खासदारांच्या स्वाक्षऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही आश्वासने पूर्ण न झाल्याने दोन खासदारांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे. त्यामुळे कथित बंडखोर गटाकडे दोन-तृतीयांश संख्याबळ आहे का, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

Omraje Nimbalkar keeps cards close to chest; says stance only after June 20, adding new twist to Thackeray camp split

महत्वाच्या बातम्या