विशेष प्रतिनिधी
नागपूर: एअर फोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीच्या जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातून फरार मौलानाला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अय्याज मदारे (26) आणि त्याचा साथीदार अमीन शेख यांना यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया गावातील हजरत मौलाना याची या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणून नोंद आहे. पीडित महिलेच्या आरोपानुसार, धर्मांतर आणि कथित निकाह प्रक्रियेत मौलानाने सक्रिय भूमिका बजावली होती.
एका व्हिडिओमध्ये एक युवक महिलेचा हात पकडून उर्दूमध्ये धार्मिक मंत्र म्हणत असल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये महिला रडताना आणि “मला सोडा” अशी विनवणी करताना दिसत असल्याने संतापाची लाट उसळली होती.
एफआयआरनुसार, 8 फेब्रुवारी 2025 रोजी अय्याज मदारेने एका हॉटेलमधील भेटीदरम्यान महिलेच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले. शुद्धीवर आल्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ पती तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच तिच्याकडून सुमारे चार लाख रुपये उकळण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी तिला एका बाटलीतील द्रव जबरदस्तीने पाजत असे. त्यानंतर उर्दूमध्ये काही मंत्रोच्चार करून तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत ते संमोहन आणि काळी जादू असल्याचा दावा करत तिच्यावर अत्याचार करत असे.
तक्रारीनुसार, 31 मे रोजी आरोपींनी महिलेला जबरदस्तीने नागपूरजवळील कळमेश्वर येथे नेले. तेथे मौलानाने धार्मिक विधी करून तिच्याकडून “कबूल है” म्हणवून घेतले आणि तिचे धर्मांतर केल्याची घोषणा केली. तसेच अय्याज मदारेसोबत तिचा निकाह लावल्याचाही आरोप आहे. पीडितेने हे सर्व तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या मौलानाची चौकशी सुरू केली असून कथित निकाहनामा, धर्मांतराशी संबंधित कागदपत्रे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का याचा तपास सुरू आहे. याशिवाय इतर महिलांनाही अशाच पद्धतीने जाळ्यात ओढून धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला होता का, याचाही तपास केला जात आहे.
Air Force officer’s wife allegedly raped, blackmailed and forced into nikah; cleric arrested in Nagpur conversion case
महत्वाच्या बातम्या
- Nagpur : कर्करोगावरील उपचार, संशोधनासाठी नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प
- महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, केंद्र सरकारकडून योजना मंजूर
- मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
- शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात, नवनाथ बन यांचा टोला