विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना वेग आला आहे. देशभरातील २४ रिक्त राज्यसभा जागांसह काही पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील एका जागेकडे विशेष लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क रंगू लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नवनीत राणा प्रयत्नशील असून त्यांनी बुधवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या सलग बैठका आणि भेटींमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात होते. मात्र पक्ष नेतृत्व त्यांना केंद्रातील राजकारणात पाठवण्यास फारसे उत्सुक नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षाकडून इतर पर्यायांचाही गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अनेक नावांवर चर्चा सुरू आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांचाही विचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या नावांसोबत नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आल्याने राजकीय उत्सुकता वाढली आहे.
पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर विविध पर्यायांवर चर्चा सुरू असून अंतिम उमेदवाराच्या नावावर येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील जागेसाठी पक्षातील अनुभवी नेत्याला संधी देणार की नवनीत राणा यांच्यासारखा नवा चेहरा पुढे आणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नवनीत राणा यांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीच्या गोटात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Navneet Rana in race for Rajya Sabha seat? Political buzz grows after key meetings
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन