विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादीत वादंग, विक्रम काकडे यांना उमेदवारी, सुनील टिंगरे यांनीही भरला अर्ज

विशेष प्रतिनिधी

पुणे: सुमारे पाच तासांच्या वादळी बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली मात्र त्यावरून पक्षात वाद निर्माण झाला आहे..राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याने काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.

पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी बाहेरच्या उमेदवाराला विरोध दर्शवला होता. तरीही विक्रम काकडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
मात्र, दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरण्याचे निर्देश मिळाल्याची माहिती सुनील टिंगरे यांनी दिली असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रम कायम आहे.

प्रत्येक पदाधिकाऱ्याला निवडणूक लढवण्याची इच्छा असते, त्यामुळे पक्षातही अनेकांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. विक्रम काकडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून, सुनील टिंगरे हे देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. चार जूनपूर्वी उमेदवारी अर्ज कोणी मागे घ्यायचा याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार घेतील, असे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले.



पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेल्या विक्रम काकडे यांच्या नावावर तब्बल पाच तास चाललेल्या बैठकीनंतर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी खासदार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ताकद लावली होती.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रविवारी रात्री साडेआठ वाजता सुरू झालेली बैठक पहाटे दीड वाजेपर्यंत चालली. या बैठकीला पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह माजी खासदार संजय काकडे हे देखील उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम ठेवण्यासाठी पक्षातील अनेक नेते आग्रही होते. त्याचवेळी भाजपमधील काही इच्छुक नेत्यांनीही या जागेसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणे जवळपास निश्चित झाले. मात्र उमेदवार कोण असणार यावर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. अखेर विक्रम काकडे यांच्या नावाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर बैठकीत त्यांच्या उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

विक्रम काकडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत श्रीकांत पाटील उमेदवारी कायम ठेवणार की माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने बहुतांश जागांवरील वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असला, तरी अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीचे संकट दोन्ही आघाड्यांसमोर उभे आहे.

NCP Faces Internal Rift Over Legislative Council Nomination; Vikram Kakade Gets Ticket, Sunil Tingre Files Nomination

महत्वाच्या बातम्या