मुंबई – पुणे एक्सप्रेसवेला सक्षम पर्याय, नेरळ-वांद्रे-शिरूर रस्त्याला राज्य सरकारची तत्त्वतः मंजुरी,

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यातील पुणे व मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या पुणे – मुंबई द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण अतिशय वाढला आहे. या रस्त्यांना पर्यायी रस्ता म्हणून उरण – कर्जत – नेरळ – वांद्रे – पाईट – शिरोली – पाबळ – मलठण – शिरूर या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीला अखेर यश आले असून मुख्यमंत्र्यांनी याला मंजुरी दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर बत्तीस तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती झाल्यामुळे रस्ता बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांना एकाच जागेवर ३० तास अडकून राहावे लागले होते. याबाबत शिरूर लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरला पर्यायी रस्ता म्हणून नेरळ ते शिरूर रस्त्याच्या चौपदारीकरच्या कामाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच प्राधान्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलावेत अशी आग्रही मागणी केली होती. तसेच नेरळ ते वांद्रे दरम्यानचा भाग हा पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. येथे अंदाजे २० किमी लांबीचा घाटमार्ग विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या आवश्यक आहेत. यासंदर्भात खा. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारकडे प्राधान्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भविष्यात पुणे – मुंबई, मुंबई – छत्रपती संभाजीनगर, मुंबई – सोलापूर या भागांसाठी कनेक्टिव्हिटी तयार होईलच, शिवाय सध्याच्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल असेही खा. अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

“महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार सह्याद्री पर्वतरांग ही कोकण व महाराष्ट्र पठार यांच्यामधील नैसर्गिक विभाजनरेषा असून कोकण व महाराष्ट्र पठार यांना जोडण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घाटमार्ग आहेत. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहणी करताना दोन घाट मार्गांमधील साधारणतः अंतर ते २५ ते ३० किमी असे आहे. परंतु केवळ माळशेज घाट ते बोरघाट या दोन घाटांमधील अंतर हे अंदाजे ते ६० किमी आहे. त्यामुळे या दोन घाट मार्गांच्या दरम्यान एक पर्यायी घाटमार्ग विकसित केल्यास वाहतुकीकरिता एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे पुणे – मुंबई बरोबरच पुणे – शिरूर, पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव – चाकण – शिक्रापूर या रस्त्यांवरील वाहतुकीची तीव्रता कमी होणार आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.

Neral–Wandre–Shirur Road Gets In-Principle Approval as Alternative to Mumbai–Pune Expressway