प्रतिनिधी
मुंबई : डान्सबारसंबधात नवीन कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्स बार कायदा सुधारणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.येत्या अधिवेशनात डान्सबार बंदी कायद्यात सुधारणा करण्याबाबतचं विधेयक मांडलं जावून मंजूर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वीच कॅबिनेटचा अजेंडा बाहेर आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापल्याचे दिसून आले. मंत्रिमंडळ बैठकीत येणारे विषय आधीच सार्वजनिक केले जातात. माध्यमांमध्ये याबाबत चर्चा केली जाते, यावरून फडणवीस यांनी मंत्र्यांना गुप्ततेची आठवण करून देत थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि सहावा राज्य वित्त आयोगाची स्थापन करण्याची मान्यतेसह जळगाव पुणे इतर जिल्हयासाठी मोठे निर्णय घेण्यात आले. डान्सबारच्या नवीन नियमावलीत डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही. नव्या कायद्यात डिस्को आणि आर्केस्ट्रा यासंदर्भात राज्य सरकारची परवानगी संदर्भात हा बदल करण्यात येणार असून, अनेक नवीन नियम असण्याची शक्यता आहे, डान्सबार संदर्भात नियम आणि कायदा करताना समितीमध्ये डान्सबार यांचा प्रतिनिधी असावा, अशा काही नियमांचा समावेश नवीन कायद्यात करण्यात येण्याची शक्यता आहे.
२०१६ मध्ये फडणवीस सरकारनेच केला होता कायदा, आता त्यात नव्या तरतुदी होणार
२००५ साली तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता, बारबालांवर पैसे उधळण्यासाठी गैरप्रकार करणे, गुन्हेगारीत वाढ होणे, अशा विविध कारणांनी ही बंदी घालण्यात आली होती. या विरोधात डान्सबार मालकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली, मात्र कडक अटी आणि नियम लागू केले होते. २०१६ साली फडणवीस सरकारने महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन डान्स इन हॉटेल्स, रेस्तराँ अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन अॅक्ट २०१६ हा नवा कायदा केला होता. या कायद्यात आता नव्या तरतुदी करून नवीन नियम करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.
अन्यथा मला कारवाई करावी लागेल : फडणवीस
डान्सबारसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजून निर्णय झालेला नाही. अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट होण्याआधीच काही लोक अजेंडा फोडतात. हे चुकीचे आहे. मी मंत्र्यांनादेखील सांगितले आहे की कॅबिनेटचा अजेंडा गुप्त ठेवायचा असतो. तशी आपण शपथही घेतलेली आहे. हे त्यांनी त्यांच्या कार्यालयांना सांगावे. अन्यथा मला कारवाई करावी लागेल.
नव्या कायद्यातील संभाव्य तरतुदी
- डिस्को ऑर्केस्ट्राच्या परवानगीत बदल
- डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही
- डान्सबार फ्लोअरवर चारपेक्षा अधिक बारबालांना बंदी
- बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचे अंतर
- ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही
- डान्सबारमध्ये धूम्रपानास मनाई
- बारबालांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे
- बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत