विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपने अनपेक्षित विजय मिळवत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली. भाजपला अप्रत्यक्ष मदत करणारे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांनी केलेल्या सर्व नियुक्त्यांनाही स्थगिती देण्यात आली आहे. Chandrapur
महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सोनाली महाडुळे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. त्यांना ३१ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार संगीता खांडेकर यांनी ३२ मते मिळवत विजय मिळवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काही अपक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला.
एकूण ६६ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले, तर एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा ३२ वर आला आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला.
या पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, याबाबतचे आदेश महासचिव किसन चव्हाण यांनी पत्राद्वारे दिले आहेत. भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांवर करण्यात येत आहे.
चंद्रपूरमध्ये काँग्रेस सर्वाधिक २७ जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिली. ठाकरे गटाच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसच्या हातातून सत्ता निसटली. विशेष म्हणजे, यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र स्थानिक स्तरावर वेगळेच राजकीय समीकरण घडले.
भाजपने शिवसेना ठाकरे गटाला सव्वा वर्षानंतर महापौरपद देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. तसेच पहिल्या आणि चौथ्या वर्षी स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचीही तयारी दर्शवण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील गटबाजीही या पराभवामागील एक कारण मानले जात आहे. निकालानंतर काँग्रेसचे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले होते. पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर ते महापौर निवडणुकीत एकत्र आले असले, तरी अंतर्गत मतभेदांचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला.
भाजपने कुशल राजकीय डावपेच आखत काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळवले असून चंद्रपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली आहे.
Political Earthquake in Chandrapur: BJP’s Shock Mayor Win Triggers Vanchit City Chief’s Ouster
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना (उबाठा) च्या भुमिकेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा, राज ठाकरे यांचे सरसंघचालकांना आव्हान
- राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला
- उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात