खरात प्रकरणावरून रोहित पवारांचा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा; ‘एकालाच टार्गेट, मुख्य सूत्रधार मात्र नामानिराळे’

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या कथित लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत खरात प्रकरणात सत्ताधारी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांचा संबंध असल्याचा दावा केला. मात्र, आतापर्यंत केवळ एका व्यक्तीला लक्ष्य करण्यात आले असून इतर प्रभावशाली व्यक्तींना जाणीवपूर्वक वाचवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आले आहे. टार्गेट केलेल्या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ती मात्र नामानिराळी आहे,” असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.



याचबरोबर त्यांनी एका ट्रॅव्हल कंपनीशी संबंधित कथित दस्तावेजाचा फोटोही शेअर केला. या दस्तावेजामध्ये अशोक खरात, रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि सुनील तटकरे यांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही प्रवासाच्या तारखा आणि आर्थिक व्यवहारांचा उल्लेखही या कागदपत्रात असल्याचे दिसून येत आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदे गेली, तर दुसऱ्याच्या घरात आधीच दोन पदे असताना आता तिसरे पदही आले. हा महाराष्ट्रातील पॉलिटिकल गेम आहे.”

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाने (SIT) सुमारे सहा तास चौकशी केली आहे. या चौकशीनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली असून विरोधकांकडून तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

रोहित पवार यांच्या ताज्या वक्तव्यानंतर खरात प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळाले आहे.

Rohit Pawar targets Sunil Tatkare over Kharat case; ‘Only one person targeted while key players remain untouched’

महत्वाच्या बातम्या