Sanjay Raut : संजय राऊत म्हणतात, 2014पासून देशात आणीबाणीचा बाप!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकशाहीत आणीबाणीला संवैधानिक मान्यता आहे. इंदिरा गांधी यांनी संविधानाच्या चौकटीत राहून आणीबाणी लागू केली होती. पण 2014पासून देशात जी स्थिती आहे, ती आणीबाणीचा बाप असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.



तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशभरात आणीबाणी लागू केली होती. त्याला आता 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भाजपाकडून आजचा (बुधवार) दिवस संविधान हत्या दिवस पाळण्यात येत आहे. तथापि, ही भाजपाची नौटंकी आहे, अशी टीका करतआणीबाणीचे समर्थन राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते म्हणाले, आणीबाणीला पन्नास वर्षे झाली असून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी त्याचे समर्थन केले होते. पण भाजपाला कशाचाही उत्सव आणि राजकारण करायला आवडते. आता ते ही आणीबाणी संविधानविरोधी किंवा संविधान हत्या दिन म्हणून कसे म्हणू शकतात? बाहेरील किंवा अंतर्गत शक्तिपासून देशांतील सुरक्षेला धोका निर्माण होत असेल, कोणी अराजकता पसरवू पाहात असेल तर, पंतप्रधान राष्ट्रपतींच्या मंजुरीने आणीबाणी लागू करू शकतात. हा संविधानाने कोणत्याही सरकारला दिलेला अधिकार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधानाचा सन्मान करून आणीबाणी लागू केली होती.

देशात आणीबाणी लागू करण्यामागची कारणेही इंदिरा गांधी यांनी जनतेसमोर मांडली होती. तसेच स्थिती सुधारल्यानंतर आणीबाणी मागे घेईन, असे त्या म्हणाल्या होत्या आणि त्यांनी तसे ते केलेही. शिवाय, लगेच निवडणुका घेऊन त्या त्याला सामोऱ्याही गेल्या होत्या. हेराफेरी करून, दहशत आणि भीती दाखवून पैशांच्या ताकदीवर निवडणुका त्या जिंकू शकल्या असत्या. असे प्रकार आज सुरू आहेत. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्या संविधानाच्या चौकीदार होत्या. पण त्यांनी तसे केले नाही. त्या निवडणूक हरल्या, त्यांचा पक्षही पराभूत झाला होता, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

राऊत म्हणाले, त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीची तुलना करता येईल. 2014पासून देशात अघोषित आणीबाणी आहे. त्यावेळी आणीबाणीत दिल्लीतील तुर्कमान गेट येथे संजय गांधी यांनी त्यावेळी बुलडोझर चालवला होता, असे सांगितले जाते. पण आजकाल तर दररोज गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवला जात आहे. विशेष म्हणजे, जात आणि धर्म विचारून बुलडोझर कारवाई केली जात आहे.

Sanjay Raut says, the father of Emergency in the country since 2014!

महत्वाच्या बातम्या