विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पातळी सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खडूस बाई, वांझ अर्थसंकल्प असे शब्द वापरले आहेत.
अर्थसंकल्प मांडल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जागेवरून उठून निर्मला सीतारमण यांच्याकडे गेले आणि त्यांचं अभिनंदन केलं. देशभरात सामान्य नागरिकांकडून अर्थसंकल्पावर स्तुतिसुमनं उधळली जात आहेत. प्राप्तिकरासंदर्भात सूट मिळाल्यामुळे नोकरदार खुश आहे.
निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प मांडताना त्यात नव्या कररचनेतील करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ७ लाखांवरून वाढवून १२ लाख केली. त्यामुळे आता १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असणार्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागणार नाही.
मात्र, ‘सुरीला मध फासून गळा कापण्यात हे लोक पटाईत आहेत’, अशी टीका करत सामना दैनिकाच्या अग्रलेखात अर्थसंकल्पावर टीका करताना म्हटले आहे की, निर्मला सीतारामन या ‘खडूस’ बाईने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अद्यापही भक्तांचे टाळ्या वाजवणे संपलेले नाही. जणू काही सामान्य जनता व मध्यमवर्गीयांच्या घरावर सोन्याची कौलेच चढणार आहेत अशा पद्धतीचा गाजावाजा सुरू झाला आहे.मुळात देशात किती लोक इन्कम टॅक्स भरतात? तर साधारण साडेतीन कोटी लोक. त्यातील दोन कोटी लोकांचे उत्पन्न सात लाखांपेक्षा कमी आहे. म्हणजे त्यांना आधीच सूट मिळाली आहे. दीड कोटीत फार तर ८०-८५ लाख हे पगारदार किंवा नोकरदार असतील. त्यातील ५० लाख लोकांचे पगार १२ लाखांच्या आसपास आहेत. मग उरले किती? तर साठे लाख. म्हणजे नव्या कर प्रणालीचा फायदा फार तर पन्नासेक लाख लोकांना होईल, पण ढोल असे वाजवले जात आहेत की, ४५ कोटी लोकांना फायदा होणार आहे.
निर्मला सीतारामन यांना सामान्य कुवतीची महिला म्हणताना म्हटले आहे की, हे बजेट काही असाधारण वगैरे नाही. सामान्य कुवतीच्या महिलेने सामान्य बुद्धिमत्तेच्या सरकारसाठी तयार केलेले हे राजकीय बजेट आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी मोदी-शहांनी आधीच फुकटच्या रेवड्या वाटल्या आहेत. बिहारातदेखील निवडणुका तोंडावर असल्याने पैसा आणि योजनांचा पाऊस बिहारवर पडला. त्यामुळे नेहमीप्रमाणे हे बजेट निवडणूकप्रधान आहे. ते काही देशासाठी वगैरे नाही.
‘सुरीला मध फासून गळा कापण्यात हे लोक पटाईत आहेत. मध्यमवर्गीयांच्या कत्तलीस आता लवकरच सुरुवात होईल. हा आमचा दावा नसून मोदी सरकारची पावले त्याच दिशेने पडत आहेत. हिंदुस्थानवर कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे व देश चालविण्यासाठी नवे कर्ज घेण्याचा सपाटा सुरू आहे. या अर्थसंकल्पामुळे महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नाही. मग हा असला वांझ अर्थसंकल्प काय कामाचा?’ असेही या अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेखात लाडकी बहिण योजनेवरही टीका केली आहे. गोवा, महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश अशा राज्यांत ‘लाडक्या बहिणीं’ना महिन्याला हजार-पंधराशेचे आमिष दाखवून त्यांना खूश केले जात असेल तर त्यास काय महिला वर्गाचा विकास म्हणायचा? मोदींनी शेतकरीन्मुख बजेट सादर करण्याचा पराक्रम केलाच होता, पण मोदी आल्यापासून शेतकरी शेतमालास किमान भाव मिळावा म्हणून उपोषण व आंदोलन करीत आहे आणि आजही पंजाब-हरयाणात शेतकरी उपोषणाला बसला आहे. मोदींनी रोजगारकेंद्रित बजेट आणले. मोदी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते. प्रत्यक्षात मोदी राज्यात नोकऱ्यांचा दुष्काळ पडला आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर बाजारात विकले जात आहेत.
बेरोजगार राज्याराज्यांत आंदोलनासाठी रस्त्यांवर उतरला आहे व मोदींचे पोलीस बेरोजगारांवर लाठीमार करीत आहेत. नोकऱ्या नाहीत त्यांनी त्यांनी पकोडे तळावेत असा मोदींचा मंत्र आहे. मोदींनी आता मध्यमवर्गास दिलासा वगैरे देणारा एक नागमोडी अर्थसंकल्प पेश केला. त्यामुळे मध्यमवर्गाने सावध राहिले पाहिजे. सुरीला मध फासून गळा कापण्यात हे लोक पटाईत आहेत. मध्यमवर्गीयांच्या कत्तलीस आता लवकरच सुरुवात होईल. हा आमचा दावा नसून मोदी सरकारची पावले त्याच दिशेने पडत आहेत. हिंदुस्थानवर कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे व देश चालविण्यासाठी नवे कर्ज घेण्याचा सपाटा सुरू आहे. 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे लोकांच्या हातात पैसा उरेल व त्यांची क्रयशक्ती वाढेल असे बोलले जात आहे त्यात फारसे तथ्य नाही.
या अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटाने पुन्हा एकदा ईव्हीएम मुद्दा मांडताना म्हटले आहे की, काळा पैसा आणि बनावट नोटांचा देशात सुळसुळाट सुरू आहे. त्यावर अर्थसंकल्पात कुठलाही तोडगा नाही, पण 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा करून हे सरकार लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करीत आहे. मध्यमवर्गीयांनी मोठ्या प्रमाणात मोदींच्या विरोधात मतदान केले. त्या मतांची चोरी करून भाजपने विजय मिळविला. भाजपच्या विजयाने मध्यमवर्गीय खूश नाही. त्यांना खूश करण्यासाठी 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याचा फंडा आणला, पण सुरीला मध लावून ती मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवण्याचाच हा प्रकार आहे. तेव्हा सावधान !
Sanjay Raut target to Nirmala Sitaraman
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक