विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर शिरसाटांचा पलटवार; “कार्यकर्त्यांना ‘वेश्या’ म्हणणे हा अपमान”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी “आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले” असे केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे. वडेट्टीवार यांचे विधान नैराश्यातून आले असून ते स्वतःच्या कार्यकर्त्यांचा अपमान करणारे असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.Shirsat

शिरसाट पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “आपल्या पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले किंवा निवडणुकीत माघार घेतली म्हणून त्यांना ‘विकले गेले’ म्हणणे चुकीचे आहे. हे कार्यकर्त्यांना वेश्या म्हणण्यासारखे आहे. एवढी वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा असा अपमान करणे योग्य नाही.”

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले असून बुडणाऱ्या जहाजात कोणी बसत नाही, त्याचप्रमाणे कार्यकर्तेही अशा परिस्थितीत पक्ष सोडतात, असा टोला त्यांनी लगावला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत, “तेव्हा झालेल्या पक्षांतरांना काय म्हणायचे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

काही नेत्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले, अशा प्रकारची मागणी करणाऱ्यांना मानसिक रुग्णालयाची गरज आहे. आम्ही अशा विधानांकडे गांभीर्याने पाहत नाही.

राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीच्या चर्चेवर बोलताना शिरसाट म्हणाले की, राज ठाकरे यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. “संजय राऊत निरोप घेण्यासाठी किंवा देण्यासाठी गेले असतील, असे वाटत नाही. ते उद्धव ठाकरे यांच्या तक्रारी घेऊन राज ठाकरे यांच्याकडे गेले असावेत.



‘डिक्कीत पैसे’ या आरोपांबाबत विचारले असता शिरसाट यांनी संबंधितांनी थेट नावे घ्यावीत, असे आव्हान दिले. “शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम करू नका. स्वतःच्या घरातील प्रश्नांकडेही लक्ष द्या.
शिवसेना आमदार वैभव नाईक यांना आलेल्या नोटिसीबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, “नोटिसा अनेक राजकीय नेत्यांना येत असतात. त्याचे समाधानकारक उत्तर दिल्यास पुढील कारवाई होत नाही. वैभव नाईक योग्य उत्तर देतील.”

नाशिक आणि पुण्यात समोर आलेल्या कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांबाबत शिरसाट यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी दावा केला की हे प्रकार केवळ एका शहरापुरते मर्यादित नसून राज्यभर पसरलेले जाळे असल्याचे दिसत आहे.TCS प्रकरणातील पीडित महिलेच्या जबाबातून तिला विविध प्रकारे मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आल्याचे दिसते. तिची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न झाले. मुख्य आरोपी अद्याप मोकाट असून मोठ्या आरोपींपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.अशा घटनांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तक्रार मिळताच तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणीही शिरसाट यांनी केली. अनेक महिला आणि मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारींनाही गांभीर्याने घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Shirsat Hits Back at Wadettiwar; “Calling Party Workers Prostitutes Is an Insult”

महत्वाच्या बातम्या