खोटं बोलणं थांबवा, आत्मपरीक्षण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप करत आज देशभरातील वर्तमानपत्रांत एक लेख प्रसिद्ध केला. या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना राहुल गांधींना खोटं बोलणं थांबवून आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

फडणवीस म्हणाले की, “जोवर राहुल गांधी जमिनीवर उतरत नाहीत, खोटं बोलणं सोडत नाहीत आणि स्वतःला शहाणा समजणं थांबत नाही, तोवर त्यांच्या पक्षाचा एकाही निवडणुकीत विजय होणार नाही. देशात लोकशाही आहे, इथं जनतेचा कौल अंतिम असतो. मात्र राहुल गांधींना तो स्वीकारण्याची मानसिकता नाही.



मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की राहुल गांधी वारंवार परदेशात जाऊन भारताच्या निवडणूक यंत्रणेवर संशय व्यक्त करतात आणि देशाची बदनामी करतात. त्यांनी याआधीही अमेरिकेतील बोस्टन येथील कार्यक्रमात अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. “राहुल गांधी यांचे आरोप केवळ पराभवातून आलेल्या नैराश्याचे लक्षण आहेत.

“महाराष्ट्रातला पराभव पचवता न आल्याने राहुल गांधींनी मतदार यादीतील फेरफार, मतदानातील वाढ, निवडणूक आयोगाचे मॅनेजमेंट असे अनेक निराधार आरोप केले आहेत. पण सत्य हेच आहे की काँग्रेसला स्वतःच्या घरातच विश्वासार्हता उरलेली नाही. त्यांच्या मित्रपक्षांनी देखील त्यांच्यावर डाव खेळला हे त्यांनी विसरून चालणार नाही,” असा घणाघात फडणवीसांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “राहुल गांधींच्या बोलण्यात काही तथ्य नसते. ते स्वतः जे बोलतात त्यांनाही त्याचा अर्थ माहिती नसतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. लोकशाही व्यवस्थेवर खोटं बोलून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे.”

“राहुल गांधींना वाटतं की खोटं वारंवार बोललं की लोक ते खरं समजतील. पण हे पद्धतशीर खोटं बोलणं आता जनतेच्या लक्षात आलं आहे. निवडणूक आयोगाने सुस्पष्ट आकडेवारीसह निवडणूक प्रक्रिया पार पाडली असून राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी खोटं बोलून स्वतःला दिलासा देणं थांबवून वास्तव स्वीकारावं, अन्यथा काँग्रेसचे भवितव्य धूसरच राहील,” असा सल्लाही फडणवीसांनी दिला.

Stop lying, do self-examination, Chief Minister Devendra Fadnavis advises Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या